वागातोर-हणजुण येथे राहणार्या लुइजा फर्नांडिस या ७० वर्षीय महिलेचा राहत्या घरात खून झाल्याचे आढळून आले. काल संध्याकाळी ५.३० वा. हा प्रकार उघडकीस आला.
सविस्तर माहितीनुसार लुईजा ही अविवाहित होती व भावाच्या घरी राहत होती. दरम्यान, भावाचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले असून ती व तिची भावजय सोबत राहत होती. काल काही परिचितांनी त्यांच्या घरी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे ते घरी येऊन पाहतात तर लुईजा व तिची भावजय दोघेही बेशुद्धावस्थेत होते. लुईजा हिच्या तोंडातून रक्त येत होते. नंतर तिला मृत घोषित करण्यात आले. तर भावजईला गोमेकॉत दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, लुईजाच्या शेजारी काही इंजेक्शने सापडली असून ती विषाची असून तिच टोचून खून करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास चालू असून काल रात्री उशीरापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. खूनामागील कारण पोलीस शोधत आहेत.