हडफडे-बार्देश येथील व्हेगस सुपरमार्केटजवळ भरधाव कारने ठोकरल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. अमीरुल हक (44) असे मृत चालकाचे नाव आहे. काल सकाळी हा अपघात घडला. या अपघातात सहप्रवासी एक महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी कारचालक शुभम सिंहदेव याच्याविरुद्ध हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सकाळी हडफडे-बार्देश येथील व्हेगस सुपरमार्केटजवळील रस्त्यावरून जीए-08-आर-8379 क्रमांकाची फॉर्च्युनर कार भरधाव वेगाने जात असताना त्या कारची धडक समोरून येणाऱ्या जीए-03-बी-1965 क्रमांकाच्या दुचाकीला बसली. तसेच कारने विजेच्या खांबालाही धडक दिली, त्यात तो खांबही कोसळला. कारच्या धडकेने दुचाकीवरील दोघेजण उसळून खाली पडल्याने अमीरुल हक याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेल्या 54 वर्षीय श्रीमती शीला नामक महिला गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर कारचालक शुभम सिंहदेव याने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न देता किंवा पोलिसांना न कळवताच घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे वेगवेगळ्या कलमांन्वये हणजूण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सदर फॉर्च्युनर कार मितेश हडफडकर या इसमाची आहे, त्याने ती शुभम सिंहदेवला भाड्याने दिली होती. या प्रकरणात हडफडकर याच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.