हक्कभंग ठरावावरून विधानसभेत गदारोळ

0
6

>> सभापतींविषयीच्या आक्षेपार्ह विधानांबाबत माफीनाम्याची मागणी

>> काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांचा माफीनाम्यास नकार

>> पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास वाया

>> शाब्दिक चकमकींमुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा केले स्थगित

काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एसटी आरक्षणासंबंधीच्या आपल्या एका खासगी ठरावाच्या अनुषंगाने सभापती रमेश तवडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करून हक्कभंग केल्याचा ठराव काल भाजपचे आमदार दाजी साळकर यांनी विधानसभेत मांडला. तसेच माफीनाम्याची मागणी केली. हा ठराव मांडल्यानंतर सभागृहात सत्ताधारी व विरोधी आमदार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी झडल्या. त्यामुळे सभापतींना दोनदा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. परिणामी काल पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाला एकही तारांकित प्रश्न चर्चेसाठी येऊ शकला नाही.

काल विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच सत्ताधारी भाजपचे आमदार दाजी साळकर यांनी काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा ठराव आणल्याने सभागृहात गदारोळ माजला. एल्टन डिकॉस्टा यांनी एसटींच्या राजकीय आरक्षणासंबंधीचा एक खासगी ठराव सभापतींकडे सादर केला होता; मात्र सभापतींनी तो अधिवेशनात चर्चेसाठी संमत करून न घेता फेटाळून लावला होता. या विषयावरून एल्टन डिकॉस्टा यांनी माध्यमांशी बोलताना सभापतींविषयी आक्षेपार्ह विधाने केली, असा दावा करून दाजी साळकर यांनी त्यांच्याविरुध्द हक्कभंगाचा ठराव काल अधिवेशनात मांडला.

यानंतर सदर मुद्द्यावरून प्रश्नोत्तराच्या तासाला सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी झडल्या. त्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज दोनदा स्थगित करावे लागले. त्यामुळे काल प्रश्नोत्तराच्या तासाला एकही तारांकित प्रश्न विधानसभेत चर्चेसाठी येऊ शकला नाही.
माध्यमांशी बोलताना एल्टन डिकॉस्टा यांनी एसटींच्या राजकीय आरक्षणासंबंधीच्या आपल्या खासगी ठरावावरुन सभापतींविषयी आक्षेपार्ह विधाने केलेली असून त्याबाबत त्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी दाजी साळकर यांनी केलेली मागणी एल्टन डिकॉस्टा व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी फेटाळून लावल्यानंतर सभागृहात सत्ताधारी व विरोधक भिडले.

एल्टन डिकॉस्टा यांनी सभापतींविषयी कोणतीही आक्षेपार्ह विधाने केलेली नसल्याने त्यांनी माफी मागण्याची मुळीच गरज नसल्याची भूमिका युरी आलेमाव यांनी घेतली; मात्र यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्या भूमिकेला विरोध दर्शवत, डिकॉस्टा यांनी सभापतींचा अपमान करून हक्कभंग केलेला आहे. त्यामुळे त्यांना माफी मागावीच लागेल, अशी जोरदार मागणी केली. यानंतरही युरी आलेमाव यांनी ते माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले. हवे तर त्यांना सभागृहाच्या हक्कभंग समितीकडे न्या. त्यांनी खरोखरच हक्कभंग केला आहे का याचा फैसला हक्कभंग समितीला करू द्या, अशी सूचना केली. मात्र, सत्ताधारी पक्षाने माफीचा आग्रह धरल्याने सत्ताधारी व विरोधक यांच्यात बाचाबाची सुरुच होती. यावेळी सभापतींनी त्यांना शांत करण्याचा अयशस्वी प्रश्न केला. सत्ताधारी व विरोधक हे शांत होत नसल्याचे पाहून सभापतींनी 12.15 च्या सुमारास कामकाज स्थगित केले.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर एसटींच्या राजकीय आरक्षणासंबंधीचा प्रश्न यापूर्वी आमदार गणेश गावकर यांनी मांडला होता आणि तो कामकाज घेतल्याने त्यावर सभागृहात चर्चाही झाली होती, अशी माहिती सभापतींनी यावेळी दिली. तसेच याच प्रश्नावरील एक लक्षवेधी सूचनाही सभागृहात चर्चेसाठी आली होती. आता सरकारने राज्यातील एसटींच्या राजकीय आरक्षणासंबंधीचा मुद्दा केंद्र सरकारसमोर ठेवलेला आहे, अशी माहिती सभापतींनी सभागृहात दिली.
यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक वाढल्यानंतर सभापतींनी परत एकदा सभागृहाचे कामकाज स्थगित केले. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासाला काल विधानसभेत एकही तारांकित प्रश्न चर्चेसाठी येऊ शकला नाही.