महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत निर्घृण हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला, वाल्मिक कराड याला राजाश्रय दिल्याचा आरोप होणारे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ह्या हत्या प्रकरणावरून, तसेच पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात बसमध्ये एका सव्वीस वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावरून विरोधक घेरणार असल्याने मुंडे यांचा राजीनामा घेऊन विरोधाची धार थोडी बोथट करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. संतोष देशमुख याची हत्या ज्या अमानुष प्रकारे झाली, त्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देश हादरून गेला होता. पवनचक्की कंपनीकडे दोन कोटीची लाच मागितली गेली. एवढी मोठी रक्कम देण्यास कंपनीने असमर्थता दर्शवताच तिच्या अधिकाऱ्यांना धमकावण्यात आले, प्रकल्पस्थळीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली. कंपनी बंद पाडण्याची धमकी देण्यात आली. कंपनी बंद पडली तर तरुणांचा रोजगार जाईल म्हणून हे त्या भागातल्या मस्साजोग गावचे तीन वेळा सरपंच राहिलेले तरूण सरपंच मध्ये पडले. परंतु खंडणीखोरीत असे कोणी आडवे येऊ लागले तर कंपन्या उद्या आपल्याला खंडणी देणार नाहीत, त्यामुळे आडवा येणाऱ्याचा काटा काढा असा आदेश वरून दिला गेला. त्यामुळे सराईत गुन्हेगारांच्या मदतीने संतोष देशमुख यांचे अपहरण करून प्रचंड मारहाण करून त्यांची हत्या केली गेली. जवळजवळ तीन तास त्यांना मारहाण झाली, ह्यावरून अमानुषतेचा किती कळस गाठला गेला होता हे लक्षात यावे. लोखंडी रॉड, हॉकी स्टीक, गॅसचा पाईप आणि काय काय घेऊन ही मारहाण झाली. एवढी अमानुष मारहाण की संतोष देशमुख यांच्या अंगावर अशी एक इंच जागा नव्हती की जिथे मार लागलेला नव्हता. ही मारहाण करताना तिचे व्हिडिओ काढण्यात आले, फोटो घेण्यात आले आणि थेट व्हिडिओ कॉल करून मुख्य सूत्रधाराला दाखवले गेले. मारहाण करताना रक्तबंबाळ झालेल्या देशमुख यांच्या अंगावर लघवी करण्यापर्यंत अमानवीय किळसवाण्या वृत्तीचे दर्शन हल्लेखोरांनी दर्शवले. एवढे सगळे होऊनही आणि ह्या हल्ल्याचा सूत्रधार कोण हे समोर येऊनही पोलीस तपास मंत्र्याच्या दबावाखाली दाबला जात असल्याची जनभावना बनली होती. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरली तेव्हा शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रकरण सीआयडीकडे सोपवले होते. सीआयडीने आता 77 दिवसांनी न्यायालयात बाराशे पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. त्यातील देशमुख यांना झालेल्या मारहाणीची काटा आणणारी वर्णने वाचून आणि न्यायालयात सादर झालेली छायाचित्रे पाहून जनतेच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यामुळे ह्या सार्वत्रिक असंतोषाची दखल घेऊन ह्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचे राजकीय आश्रयदाते मानल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार होण्यास सांगणे सरकारला भाग पडले आहे. महाराष्ट्रात भाजप शिवसेना (शिंदे) राष्ट्रवादी (अजितदादा) युतीचे सरकार असल्याने आणि मुंडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याने भाजपपुढे त्यांना पदावरून कसे हटवावे हा पेच होता. त्यात अजित पवार यांनीही आजवर आपल्या मंत्र्याची पाठराखण चालवली होती. परंतु आता जनतेचा तीव्र रोष लक्षात घेऊन शेवटी मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेण्यास अजित पवार यांनी संमती दर्शवली आणि धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेले. आपण वैद्यकीय कारणांसाठी आणि ‘सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून’ राजीनामा देत असल्याचे धनंजय मुंडे आता म्हणत असले, तरी त्यांची ही सद्सद्विवेकबुद्धी जागी व्हायला एवढा काळ का जावा लागला हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. ह्या प्रकरणाला एक जातीय किनारही होती. मुंडे आणि त्यांचे हस्तक मानले जाणारे कराड हे वंजारी समाजातील. मारले गेलेले संतोष देशमुख हे मराठा समाजाचे. त्यामुळे मराठा समाज संतोष देशमुख प्रकरणात एकवटला होता. भाजपचेच आमदार सुरेश धस यांच्यापासून ते मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यापर्यंत मराठा नेते देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात उतरले होते. अखेर त्या आंदोलनाचा विजय झाला आहे. अशा प्रकारची खंडणीखोरी, राजकीय हत्या, सत्तेची मुजोरी, त्याचा तपासकामावरील परिणाम अशा अनेक गोष्टी ह्या प्रकरणात चर्चेचा विषय ठरल्या. संतोष देशमुख प्रकरणात जे घडले त्याची पुनरावृत्ती कधीही होऊ नये ह्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करणार हा खरा प्रश्न आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा एक भाग झाला. देशमुखांना धडा शिकवण्याचा आदेश देणारा मुख्य सूत्रधार जेव्हा फासावर चढेल तेव्हाच त्या कुटुंबाला तो खरा न्याय ठरेल.