स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधम दत्ता गाडेला काल पहाटे पुणे पोलिसांनी अटक केली. यानंतर पुणे न्यायालयाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरुरमधून त्याला अटक करण्यात आली आणि नंतर त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले.
पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलात्काराची घटना घडली होती. बलात्कारानंतर हा आरोपी जवळपास तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथके पाठवली होती. अखेर सीसीटीव्ही फुटेज, श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी पहाटे अटक केली.
यानंतर आरोपीला काल पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणात आरोपीसोबत आणखी साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा असून, त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली. आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत. त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते आहे. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे. आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपसायचे आहे, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपीला पुणे न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी दिली.