स्वातंत्र्यसैनिक प्रेमा पुरव यांचे पुण्यात निधन

0
13

गोमंतकीय कन्या, सामाजिक कार्यकर्त्या, स्वातंत्र्यसैनिक आणि अन्नपूर्णा महिला मंडळाच्या संस्थापिका पद्मश्री प्रेमा पुरव यांचे मंगळवारी पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. पुण्यात वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या इच्छेनुसार कुठलेही अंत्यविधी करण्यात आले नाहीत. त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रेमा पुरव यांचा जन्म 15 ऑगस्ट 1935 रोजी गोव्यात झाला. त्या पूर्वाश्रमीच्या प्रेमा प्रभू तेंडुलकर. त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी आपला भाऊ काशिनाथ तेंडुलकर याच्यासोबत गोवा मुक्ती संग्रामात उडी घेतली. पुढे त्या बेळगाव येथे भूमिगत राहून गोवा मुक्ती संग्रामात कार्यरत राहिल्या. तेथेच त्यांना कॉम्रेड कृष्णा मेणसे यांच्याकडून साम्यवादाची दीक्षा मिळाली. पुढे त्या मुंबई शहरात आल्या. तिथे त्या कम्युनिस्ट पक्षाच्या कम्यूनमध्ये काही काळ राहिल्या. त्यांचा विवाह कॉम्रेड दादा पुरव यांच्याशी झाला. ते पुढे बँक कर्मचाऱ्यांची देशभरातील मोठी संघटना ‘एआयबीईए’चे प्रमुख नेते झाले. प्रेमाताई व दादा पुरव हे दोघेही गोवा मुक्ती संग्राम आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झाले होते. 1960 च्या पुढील काळात प्रेमाताईंनी भारतीय महिला फेडरेशन, गिरणी कामगार युनियन, महागाई प्रतिकार संयुक्त महिला समिती या कार्य केले.

1975 चे वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून युनो ने जाहीर केले होते. ह्याच वर्षी प्रेमाताई आणि सरस्वती जगताप ह्यांनी गिरण गावातील महिलांना एकत्र करून अन्नपूर्णा महिला मंडळ ह्या खानावळवाल्या महिलांच्या संघटनेची स्थापना केली. त्यांची जन्मभूमी गोवा आणि कर्मभूमी महाराष्ट्र राहिली. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 2002 मध्ये भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार प्रदान केला.
गेली वीस वर्षे प्रेमा ताई पुण्यामध्ये त्यांच्या मुलीच्या घरी निवृत्तीचे जीवन जगत होत्या. प्रेमाताई व दादांना तीन कन्या आहेत. अंत्यसंस्कारावेळी डॉ. मेधा पुरव सामंत, विशाखा पुरंदरे, माधवी कोलांकरी ह्या त्यांच्या तीन कन्या, जावई, नातवंडे, तसेच अनेक जवळचे नातेवाईक व कार्यकर्ते हे वैकुंठ स्मशानभूमीत प्रेमाताईंना शेवटचा निरोप द्यायला उपस्थित होते.