>> 25 मे रोजी वाढदिनी पणजीत भव्य कार्यक्रम
गोव्याच्या ख्यातनाम स्वातंत्र्यसेनानी लिबिया लोबो सरदेसाई यांचा शंभरावा वाढदिवस येत्या 25 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काल पणजी येथील त्या रहात असलेल्या चर्च स्क्वेअर परिसरात एका छोटेखानी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
चर्च स्क्वेअर परिसरातील एका इमारतीत लिबिया लोबो यांची सदनिका आहे. त्या राहत असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या एका इमारतीच्या भिंतीवर त्यांच्या शंभराव्या वाढदिनामित्त त्यांचे एक भित्तीचित्र रंगवण्यात आलेले आहे. याच इमारतीजवळ काल हा स्नेहमेळावा संपन्न झाला.
गोवा मुक्ती चळवळीतील एक वीरांगना असलेल्या लिबिया लोबो सरदेसाई यांनी 1955 साली आपले पती वामन सरदेसाई यांच्यासह एक भूमिगत रेडिओ स्टेशन सुरू केले होते. 1961 साली गोवा मुक्तीपर्यंत हे रेडिओ स्टेशन सुरू राहिले. गोवा मुक्तीलढ्यासाठी या रेडिओ स्टेशनची खूप मदत झाली.
रेडिओ स्टेशनद्वारे स्वातंत्र्यलढा
पोर्तुगीज राजवटीने कडक सेन्सॉरशीप लावून जनतेचे व स्वातंत्र्यसैनिकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालवला असता लोबो दाम्पत्याने सुरू केलेल्या भूमिगत रेडिओ स्टेशनमुळे स्वातंत्र्यसैनिकांचे नैतिक बळ वाढण्यास मोठी मदत झाली होती. लिबिया लोबो व वामन सरदेसाई हे दाम्पत्य हे स्टेशन ‘केसरलॉक’ येथून चालवत होती. 17 डिसेंबर 1961 रोजी त्यांच्या रेडिओ स्टेशनवरुन त्यांनी पोर्तुगीज गव्हर्नर जनरलना शरणागपती पत्करण्यासंबंधीचा भारतीय संरक्षणमंत्र्यांचा संदेश पाठवला. त्यांच्याकडून प्रत्युत्तर न आल्याने मग लष्कराची ऑपरेशन विजय मोहीम सुरू करण्यात आली.
स्वातंत्र्यानंतर सामाजिक कार्य
स्वातंत्र्य चळवळीतील वीरांगना असलेल्या लिबिया लोबो यांनी गोवा मुक्तीनंतरही गोव्यासाठी मोठे योगदान दिले. उच्चशिक्षित असलेल्या लिबिया लोबो सरदेसाई या गोवा मुक्तीनंतर गोवा पर्यटन खात्याच्या पहिल्या संचालक ठरल्या. त्याशिवाय त्यांनी राज्यात महिला सहकारी बँकेचीही स्थापना केली.
आज वयाच्या शंभराव्या वर्षीही लिबिया लोबो या शारिरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असून कार्यरत आहेत.
येत्या 25 मे रोजी लिबिया लोबो सरदेसाई यांचा शंभरावा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे.
‘मी वयाचे शतक पूर्ण केले असले तरी वय वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी मग काहीही करावे लागलेले नाही. त्यामुळे वयाचे शतक पूर्ण करण हे माझे एक योगदान आहे, असे मी म्हणू शकत नाही’, असे काल दै. नवप्रभाशी बोलताना लिबिया लोबो सरदेसाई यांनी स्पष्ट केले.