नववर्ष 2025 चे आगमन दिमाखात झाले आहे. ह्या वर्षाचा विशेष म्हणजे एकविसाव्या शतकाच्या पहिल्या पाव भागाची सांगता करणारे हे वर्ष आहे. जगामध्ये प्रचंड उलथापालथी ह्या गेल्या 24 वर्षांमध्ये घडल्या. केवळ विज्ञान – तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये मोठी उलथापालथ घडवणारा हा कालखंड होता. एका डिजिटल युगाची सुरूवात ह्या शतकात झाली. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पुढच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत. त्याचे जसे प्रचंड फायदे आहेत, तसा त्यापासून प्रचंड धोकाही असल्याचे प्रत्ययास येऊ लागले आहे. मानवी जीवनाला विकासाच्या आणि कदाचित विनाशाच्याही एका नव्या टप्प्यावर हा काळ घेऊन गेला आहे यात शंका नाही. आजपासून सुरू झालेले हे नवे वर्षही त्याचेच एक पुढचे पाऊल आहे. एकीकडे युक्रेन – रशिया, हमास – इस्रायल अशी प्रदीर्घ काळ चाललेली युद्धखोरी, जागतिक महासत्तांमधील सततचे शीतयुद्ध, हवामान बदलांमुळे जगापुढे आ वासून उभे असलेले संकट, वाढतीय सायबर गुन्हेगारी अशी अक्राळविक्राळ आव्हाने, तर दुसरीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सर्व क्षेत्रांमध्ये येऊ घातलेली प्रचंड क्रांती, अंतराळातील वसाहतीच्या नव्या नव्या शक्यतांची चाललेली चाचपणी, अशा तराजूच्या दोन तागड्यांवर जग तोललेले आहे. आपल्या भारतासाठी सरते वर्ष चांगल्या वाईटाच्या हिंदोळ्यांवरचेच ठरले. गतवर्षाची सुरूवात अयोध्येतील श्रीराममंदिराच्या लोकार्पणाच्या ऐतिहासिक मंगल सोहळ्याने झाली होती. अवघा देश राममय होऊन गेला होता. वर्षाची सांगता भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवाच्या प्रारंभाच्या तितक्याच मंगलपर्वाने झालेली आहे. गेल्या वर्षात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा आपला विश्वास व्यक्त केला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकर आणि इतरांनी भारताचा झेंडा दिमाखात रोवला. मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा ही एक अभिमानास्पद घटनाही गेल्या वर्षात घडली. गोव्याच्या संदर्भात बोलायचे झाले, तर एकीकडे साधनसुविधांच्या उभारणीचे, प्रशासन सर्वांपर्यंत नेण्याचे सरकारचे चाललेले प्रयत्न, दुसरीकडे नोकरी घोटाळा, जमीन घोटाळा अशी डोके वर काढणारी भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणे अशा संमिश्र वातावरणामध्ये वर्ष सरले. ह्या नव्या वर्षामध्ये तरी अशी चक्रावून टाकणारी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे डोके वर काढणार नाहीत अशी आशा आहे. ह्या सगळ्या घटना घडामोडींनी सरलेल्या वर्षाच्या कडूगोड आठवणी सोबत घेऊन आपण आज नव्या वर्षात पाऊल टाकले आहे. आज एक जानेवारीस जगाची लोकसंख्या 8.09 अब्ज झालेली असेल असा एक अंदाज आहे. भारत हा त्यात 1.41 अब्ज लोकसंख्येनिशी जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला आहे. लोकसंख्येवर नियंत्रणासाठी भारताला येणाऱ्या काळात पावले उचलावी लागणार आहेत. भारतासाठी हे नवे वर्ष अनेक स्वप्नांची परिपूर्ती करणारे वर्ष ठरेल अशी अपेक्षा आहे. सरत्या वर्षाच्या अखेरीस आपल्या इस्रोने स्पेस डॉकिंगचा प्रयोग सफल करून भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने एक दमदार पाऊल टाकले आहे. गगनयान मोहिमेवर आता देशाची नजर आहे. सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताने तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न समोर ठेवलेले आहे. विकसित भारताच्या आपल्या संकल्पनेला अनुसरून केंद्र सरकार यापुढे मोठी पावले टाकील अशी अपेक्षा आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा भारतात भरवण्याचे स्वप्नही देश पाहतो आहे. त्याच्या तयारीलाही या वर्षात वेग द्यावा लागेल. नव्या वर्षात अनेक नवे धोके जगापुढे आहेत. सायबरस्कॅमना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड मिळालेली असल्याने अधिक घातक स्वरूपात फसवणूक, लुबाडणूक होण्याची शक्यता वाढली आहे. त्यावर आळा घालणाऱ्या उपाययोजना ह्या वर्षी आवश्यक असतील. राज्य सरकारलाही आपल्या स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेला अनुसरून कार्यक्षमता दाखवावी लागेल. सरकारच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या ज्या गोष्टी घडल्या, त्या दूर सारून स्वच्छ, पारदर्शक प्रशासनाचा आदर्श घालून द्यावा लागेल. नवे वर्ष येते तेव्हा नव्या अपेक्षा, आकांक्षा, इच्छा घेऊन आपण त्याला सामोरे जात असतो. हे नवे वर्ष तरी त्याला अपवाद कसे असेल? नव्या वर्षात आपले नवे संकल्प असतील. आकांक्षा असतील. त्यांच्या परिपूर्तीसाठी परमेश्वर सर्वांना कृपाशीर्वाद देवो, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि एक सुखदायी, समाधान देणारे, समृद्ध करणारे वर्ष आपल्या पोतडीत जमा होवो ह्या मनःपूर्वक शुभकामना.