आरोग्यमंत्री फ्रांसिस डिसौझा यांची माहिती
देशभरात थैमान घातलेल्या ‘स्वाइन फ्लू’ने मार्च ३ पर्यंत ११९८ जणांचे बळी घेतले असून गोव्यातही एक रुग्ण दगावल्यानंतर ८ रुग्णांना या घातक रोगाची लागण झाल्याचे सिद्ध झाल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने या रोगाची लक्षणे आढळणार्या रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवली असून गरज पडल्यास एकाच वेळी किमान शंभर रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे आरोग्यमंत्री फ्रांसिस डिसौझा यांनी सांगितले.‘स्वाइन फ्लू’ची लागण झालेले ५० रुग्ण जर एकाच वेळी गोमेकॉत आले व जर तेथे त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ आली तर ते शक्य व्हावे यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आणखी ५० रुग्णांवर आरोग्य केंद्रात उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकाच वेळी जर स्वाइन फ्लूचे शंभर रुग्ण आढळले तरी त्यांच्यावर एकाच वेळी उपचार होऊ शकेल, असे डिसौझा यांनी यावेळी बोलताना सांगितले. गोव्यात स्वाइन फ्लूची लागण झालेले ८ रुग्ण सापडले होते. पैकी सातजण यापूर्वीच रोगमुक्त झालेले आहेत, तर उपचारासाठी उशिरा आलेल्या एका रुग्णाचे निधन झाल्याचे ते म्हणाले.
बाधीत रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी नवी दिल्लीला पाठविण्यात येत असून अहवाल २४ तासांत उपलब्ध होत असल्याचे आरोग्यमंत्री डिसौझा म्हणाले. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत केलेल्या निवेदनात देशभरात या रोगाने ११९८ मरण पावले असून लागण झालेल्या रुग्णांची संख्या मार्च ३ पर्यंत २२,२४० वर पोचली असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये सर्वाधिक २९२जण मरण पावले असून ४,९०४ जणांना लागण झाली आहे. मध्ये प्रदेशात १६८, महाराष्ट्रात १७०, तेलंगणात ५९, दिल्लीत १०, कर्नाटकात ५१, हरयाणात २४, आंध्र प्रदेशात १४ तर जम्मू-काश्मिरात १० जण मरण पावले आहेत.