स्वस्थ वृद्ध – आनंदी समाज

0
5
  • डॉ. मनाली महेश पवार

वाढत्या वयानुसार शरीर आणि मन दोन्ही बदलतात. या अवस्थेत वृद्धांचे आरोग्य, त्यांची काळजी, मानसिक आधार आणि सन्मान हा समाजातील प्रत्येक सदस्याचा कर्तव्यभाग ठरतो. वृद्धांचे आरोग्य हा केवळ वैद्यकीय विषय नाही, तर संस्कार, संवेदना आणि समाजभावनेचा आरसा आहे. त्यांना प्रेम, आधार आणि सन्मान देणे हेच त्यांचे खरे आरोग्यरक्षण आहे.

आजच्या गतिमान युगात आपल्या समाजातील एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित घटक म्हणजे वृद्धवर्ग. त्यातही विभक्त कुटुंबपद्धतीने हा वर्ग जास्तच दुर्लक्षित झाला आहे. माणूस विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. आयुष्याची सरासरी वाढली आहे. पण जीवनाची गुणवत्ता मात्र अनेकदा घटलेली दिसते. आयुष्याचा हा टप्पा अनुभव, ज्ञान आणि शांततेचा असला तरी आरोग्याच्या अनेक समस्या घेऊन येतो. वाढत्या वयानुसार शरीर आणि मन दोन्ही बदलतात. या अवस्थेत वृद्धांचे आरोग्य, त्यांची काळजी, मानसिक आधार आणि सन्मान हा समाजातील प्रत्येक सदस्याचा कर्तव्यभाग आहे.

वृद्धावस्थेतील सामान्य आरोग्य समस्या

  • वयानुसार शरीरातील अवयवांची झिज होते, कार्यक्षमता कमी होते, चयापचय क्रिया मंदावते. इंद्रियांमध्ये, विषय ग्रहणांमध्ये दौर्बल्य येते.
  • सांधेदुखी व हाडांची ठिसूळता वाढते.
  • उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार डोके वर काढतात.
  • डोळ्यांचे विकार (जास्त प्रमाणात मोतिबिंदूसारखे) उद्भवतात.
  • ऐकायला कमी येऊ लागते.
  • दातांची झीज होते व दातांचे विकार उद्भवू लागतात.
  • पचनक्रियेमध्ये बिघाड निर्माण होतो, बद्धकोष्ठतासारखे आजार पाचवीला पुजलेले असतात.
  • स्मृतिभ्रंश, नैराश्य आणि झोपेच्या समस्या निर्माण होतात.
    नैसर्गिकरीत्या येणारे वृद्धत्व आपण थोपवू शकत नाही; पण योग्य आहार, दिनचर्या, तपासणी आणि मानसिक आरोग्यव्यवस्थापन यामुळे वृद्धत्वामध्ये येणाऱ्या आजारांचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थैर्य
शारीरिक आरोग्याइतकेच वृद्धाचे मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. निवृत्तीनंतर एकटेपणा, समाजापासून तुटल्याची भावना आणि ‘आपलं आता कोण?’ ही भीती मनावर परिणाम करते. त्यामुळे वृद्धांमध्ये नैराश्य येते. भय, चिंता अशा समस्या वाढतात. असुरक्षितता, दुर्लक्षाची भावना वाढते. निद्रानाश किंवा स्मृतिभ्रंशासारखे आजार उद्भवतात. त्यामुळे वृद्धांना संवाद, सहवास आणि मानसिक आधार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबातील तरुणांनी त्यांना वेळ देणे, त्यांचे अनुभव ऐकणे हा सर्वोत्तम ‘औषधोपचार’ आहे. त्यासाठी दररोज त्यांच्याशी संवाद साधा, त्यांचे अनुभव ऐका. त्यांना घरातील निर्णयांमध्ये सामावून घ्या. त्यांच्याशी नम्रपणे, सम्मानाने वागा. शक्य असल्यास सामाजिक गट, वरिष्ठ नागरिक संघ, ध्यानवर्ग यांमध्ये त्यांचा सहभाग वाढवा. असा भावनिक संवाद वृद्धांच्या मनाला नवचैतन्य देतो.

योग्य आहार ः आरोग्याचा पाया
वृद्धावस्थेत पचनशक्ती कमी होत असल्याने आहारात हलके पौष्टिक आणि संतुलित अन्न यांचे सेवन करावे.

  • सकस आहारात दूध, डाळी, भाज्या, फळे, सूप, तुपाचा मर्यादित वापर असा आहार असावा.
  • पाणी पुरेसे प्यावे, पण खूप जास्त नको.
  • तिखट, तेलकट, गोड आणि जड अन्न टाळावे.
  • संध्याकाळ झाल्यानंतर जड अन्न घेऊ नये.
    तसे पाहता ज्येष्ठांसाठी सर्वात आरोग्यदायी आहार कोणता आहे, हे खरोखर तुमच्या वैयक्तिक गरजांवर अवलंबून असते. परंतु असे काही विशिष्ट पदार्थ आहेत जे बहुतेक ज्येष्ठांच्या एकूण आरोग्याला फायदेशीर ठरू शकतात. उदा. कॅल्शियमयुक्त पदार्थ ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास मदत करू शकतात.
  • ज्येष्ठांच्या हृदयासाठी निरोगी पदार्थांमध्ये निरोगी चरबी आणि अँटी ऑक्सिडंट्ससमृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट आहेत.
  • उच्च रक्तदाब असल्यास पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त असलेले पदार्थ निवडावेत.
  • फळे आणि भाज्या
  • जीवनसत्त्वे आणि अँटी ऑक्सिडंट्सच्या बाबतीत फळे आणि भाज्यांमध्ये आरोग्यदायी गुणधर्म असतात.
  • रास्पबेरी, ब्ल्यूबेरी आणि डार्क चेरीसारख्या गडद बेरीमध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणदेखील तुलनेने कमी असते.
  • पालेभाज्या, फळभाज्या
    पालक, वेलभाज्या, फळभाज्या (दोडका, दुधी भोपळा, पडवळ) यांसारख्या पौष्टिकतेने समृद्ध भाज्या फायबरचा उत्कृष्ट स्रोत असतात. त्या कॅल्शियम, जीवनसत्त्वे ‘अ’ आणि ‘क’ आणि लोहाने समृद्ध असतात. ते हृदयरोग आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी ओळखल्या जातात.
  • लिंबूवर्गीय फळे
    संत्री, द्राक्षे आणि टेंजेरिनसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन- सी भरपूर प्रमाणात असते.
  • शेंगा
    प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत असलेले चणे, बीन्स, राजमा आणि मसूर यांच्या शेंगा जळजळ कमी करण्यास मदत शकतात.
  • प्रथिने
    ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगी आहारात प्रथिने महत्त्वाची असतात. शरीरात ती स्नायू तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास, तसेच ऊर्जा साठवण्यास मदत करतात. तुमच्या प्लेटचा अर्धा भाग भाज्यांना, एक चतुर्थांश संपूर्ण धान्यांना आणि उर्वरित एक चतुर्थांश निरोगी चरबी आणि पातळ प्रथिनांना समर्पित करण्याचा प्रयत्न करा.

सक्रिय जीवनशैली
वृद्धत्व म्हणजे निष्क्रियता नाही. उलट चालणे, योग, प्राणायाम, हलका व्यायाम आणि ध्यान हे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने ठेवतात.

  • दररोज सकाळी किमान 30 मिनिटे चालावे. ‘चालत रहा, हसत रहा, स्वस्थ रहा’ हा मंत्र वृद्धांसाठी उत्तम ठरतो.
  • श्वसनाचे व्यायाम- ‘प्राणायाम’- फुफ्फुसांना बळकटी देतात.
  • ध्यानामुळे मानसिक शांती आणि स्मृती सुधारते.

कुटुंब आणि समाजाची भूमिका
वृद्ध हे फक्त घरातील ज्येष्ठ नसतात, ते संस्काराचे आणि अनुभवांचे भांडार असतात. पण आजच्या एकल कुटुंबपद्धतीमुळे अनेक वृद्ध एकटेपणाला आणि उपेक्षेला सामोरे जात आहेत. त्यासाठी समाजाने आणि कुटुंबाने खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

  • वृद्धांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ निवासव्यवस्था.
  • आरोग्य विमा आणि वैद्यकीय मदत.
  • वृद्धाश्रमांमध्ये सन्मानाने जीवन.
  • संवाद आणि स्हेहबंध टिकविण्यासाठी कार्यकम.
    आजची तरुण पिढी उद्याची वृद्ध होणार आहे, म्हणूनच वृद्धांना आदर देणे म्हणजे स्वतःच्या भविष्याला सन्मान देण्यासारखे आहे. आयुर्वेदशास्त्रात वृद्धावस्थेला ‘वानप्रस्थाश्रम’ म्हटले आहे. त्यामुळे आत्मचिंतन, संयम आणि आरोग्याचे पालन यावर भर द्या.
  • नियमित दिनचर्या, ऋतुचर्या पालन.
  • झोप, ध्यान, सकारात्मक विचार.
  • वाताचा काळ असल्याने स्निग्धोपचार यात प्रामुख्याने अभ्यंग.

पंचकर्म उपचार ः मृदू विरेचन, अभ्यंग, स्वेदन, नस्य, शिरोधारी, कर्णपुरण हे उपचार करावेत. अश्वगंधा, शतावरी, सुंठ, हळद ही द्रव्ये वृद्धांना ताजीतवानी ठेवतात.
वृद्धांचे आरोग्य हा केवळ वैद्यकीय विषय नाही, तर संस्कार, संवेदना आणि समाजभावनेचा आरसा आहे. त्यांना प्रेम, आधार आणि सन्मान देणे हेच त्यांचे खरे आरोग्यरक्षण आहे.