मंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन
जनतेला स्वस्त दरात मासळी उपलब्ध व्हावी म्हणून ऑक्टोबरमध्ये ५ मासळीची दालने उघडण्यात येणार असल्याचे मच्छीमारीमंत्री आवेर्ताद फुर्तादो यांनी काल विधानसभेत आपल्या मागणीवरील चर्चेस उत्तर देताना सांगितले. वरील स्टॉल्स मालीम व मडगाव येथे उघडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बाहेरील ट्रॉलर मच्छीमारी बंदीच्या काळात गोव्याच्या हद्दीत प्रवेश करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्ती नौका उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. लाईफ जेकेट न वापरता समुद्रात न उतरण्याचा इशारा मंत्र्यांनी दिला. मच्छीमारी ट्रॉलरची वेळोवेळी माहिती मिळविण्यासाठी मुख्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
स्थानिक मच्छीमारांना बायोमेट्रिक कार्डे वितरित केल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व राज्यांमध्ये मच्छीमारी बंदीचा काळ समान असावा यासाठी सरकारने प्रयत्न केले असून केंद्रीय मच्छीमारीमंत्री राधामोहन सिंग यांच्याकडेही वरील मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
१०० खाटांचे ईएसआय इस्पितळ
मजूर खात्याच्या मागणीवरील चर्चेस उत्तर देताना मजूरमंत्री या नात्याने फुर्तादो यांनी उत्तर गोव्यात १०० खाटांचे ईएसआय इस्पितळ सुरू करण्याची योजना जाहीर केली. बेरोजगारांना भत्ता देण्याची योजना काही तांत्रिक कारणास्तव स्थगित ठेवली असून त्यावर अभ्यास केल्यानंतरच निर्णय होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
स्थलांतरितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिकांना वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचाही विचार त्यांनी व्यक्त केला. बांधकाम मजूरांसाठी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.