‘स्वयंपूर्ण भारत’साठी २० लाख कोटींचे पॅकेज

0
277

>> नव्या नियमांसह लॉकडाऊन-४ चीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला संबोधित करताना आत्मनिर्भर भारत अभियानसाठी २० लाख कोटी रु. च्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज देशाच्या जीडीपीच्या १० टक्के एवढे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देशातील लॉकडाऊनचा तिसरा टप्पा येत्या दि. १७ रोजी संपत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन-४ हा पूर्णपणे नव्या रंगरुपासह व नव्या नियमांचा असेल असे सांगून त्याचा तपशील १८ मेच्या आधी जाहीर करण्याचे सुतोवाच केले.

आत्मनिर्भर भारत अभियानची घोषणा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केली. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, भारताची संकल्प शक्ती प्रबळ आहे. भारत आत्मनिर्भर बनू शकतो. त्याचा पाया ५ महत्त्वपूर्ण खांबांवर अवलंबून आहे. आर्थिक, साधनसुविधा, प्रशासन पद्धती, डिमोग्राफी व मागणी हे ते ५ खांब आहेत असे ते म्हणाले.

आत्मनिर्भर भारत अभियान देशासाठी पुढील काळात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याच्या सफलतेसाठी आपले सरकार २० लाख कोटी रु. ची पॅकेज जाहीर करत आहे. या पॅकेजमुळे देशाच्या विकास यात्रेस शक्ती मिळेल, त्यामुळे भारताच्या विकासाला नवी गती मिळेल. हे पॅकेज देशातील शेतकरी, श्रमिक वर्ग मच्छीमार, मध्यमवर्गीय, उद्योग जगत, संघटीत व असंघटीत कामगार वर्ग या सर्वांसाठीच आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या पॅकेजविषयी तपशीलवार माहिती पुढील दिवसात दिली जाणार आहे. पॅकेजच्या माध्यमातून विविध स्तरांवर नवीन धाडसी सुधार केले जाणार आहेत. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी हे अनिवार्य असल्याचा दावा त्यांनी केला.

हे सुधार शेतीच्या मजबुतीसाठी, करांच्या प्रमाणीकरणासाठी, उत्तम साधनसुविधा उभारण्यासाठी, उत्तम मनुष्यबळ घडविण्यासाठी, मजबूत वित्त सुविधांसाठी, व्यवस्थापनांना उत्तेजन देण्यासाठी, मेक इन इंडिया सशक्त करण्यासाठी असेल. असे मोदी म्हणाले. या पॅकेजमध्ये अनेक तरतुदी आहेत. असे त्यांनी सांगितले.

आत्मविश्‍वासाच्या बळावर हे सर्व करणे शक्य आहे. आजच्या घडीची गरज व मागणी आहे ती म्हणजे भारत सर्व स्पर्धांमध्ये यशस्वी ठरावा. आज भारतासमोरील संकट हे प्रचंड आहे, ज्यापुढे महासत्ताही गर्भगळीत झाल्या. मात्र भारतवासियांनी या संकटात आपल्या संयमाचे दर्शन घडवले. श्रमिकांना प्रचंड कष्ट सोसावे लागले असे ते म्हणाले.

‘लोकल’साठी ‘व्होकल’
कोरोना संकटामुळे आम्हाला स्थानिकतेचे महत्त्व उमगले आहे, स्थानिक विषयांचे महत्त्व समजले आहे. त्यामुळेच सर्वच बाबतीत आत्मनिर्भर होणे ही केवळ गरज नसून ती सर्वांची जबाबदारी आहे. तो आम्हाला आमचा जीवन मंत्र बनवावा लागेल याकडे मोदींनी लक्ष वेधले. मोदी म्हणाले, आजपासून आपणाला ‘लोकल’साठी ‘व्होकल’ बनायचे आहे. केवळ स्थानिक वस्तूच खरेदी करायचे नसून त्यांचा प्रसारही करायचा आहे.

आत्मनिर्भर भारत
एका राष्ट्राच्या रुपात आम्ही महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. प्रचंड संकट एक संदेश घेऊन, एक संधी घेऊन आले आहे. जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा भारतात एकही पीपीई, एन९५ मास्क नव्हते. मात्र आज भारतात दररोज २ लाख पीपीई, २ लाख एन९५ मास्क तयार होतात. याचे कारण भारताने संकटाचे संधीत रुपांतर केले. भारताची ही दृष्टी आत्मनिर्भर भारतासाठी यश मिळवून देईल असे ते म्हणाले.
जगाला विश्‍वास आहे की भारत खूप काही करू शकतो, जगाला देऊ शकतो. प्रश्‍न आहे ते कसे शक्य आहे. त्याचे उत्तर १२० कोटी भारतीयांचा आत्मनिर्भरतेचा संकल्प हे आहे असे मोदी म्हणाले.