आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा हे आपले स्वप्न साकार करण्यासाठी दोन्ही जिल्हा पंचायती निधी आणि अधिकार या दोन्ही बाबतींमध्ये समर्थ करण्याचे अभिवचन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिले. दोन्ही जिल्हा पंचायतींमध्ये सत्ताधारी भाजपचे वर्चस्व दिसून आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेस त्यांच्यासमवेत भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, तसेच मंत्री विश्वजित राणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी हा ऐतिहासिक विजय असल्याचे प्रतिपादन केले. दोन्ही जिल्हा पंचायतींचे निकाल पाहिले तर असे दिसते की आता राज्यात असा एकही तालुका नाही की जेथे भाजपचा विजय झालेला नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. आमच्या उमेदवाराला सर्वांत मोठी आघाडी केरी मतदारसंघात मिळाल्याचे ते म्हणाले. आमच्या काही उमेदवारांचा पराभव जरी झालेला असला तरी तो अवघ्या काही मतांच्या फरकाने झाल्याचा दावा त्यांनी केला. एका उमेदवाराचा तर अवघ्या २३ मतांनी पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले.
या विजयातून जनतेने भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. ही उपांत्य फेरी आहे का असे लोक विचारत होते, परंतु भाजपसाठी प्रत्येक निवडणूक ही अंतिम फेरीच असते, असे ते म्हणाले. स्वयंपूर्ण गोवा मोहिमेद्वारे ग्रामीण गोव्याचा विकास साधला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.