‘स्वयंपूर्ण गोवा’ ते ‘सरकार तुमच्या दारी’

0
10
  • – प्रमोद ठाकूर

कल्पक उपक्रमांमुळेच लाभले दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपद

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदी निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा मान डॉ. सावंत यांना मिळाला आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत गेल्या विधानसभा निवडणुकीत साखळी मतदारसंघातून सलग तिसर्‍यांदा विजयी झाले. साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा पराभव करण्याच्या प्रयत्नांना त्यांच्या विरोधकांना यश मिळाले नाही.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ २० मार्च २०२२ रोजी पूर्ण केला. या तीन वर्षांच्या काळात केलेल्या कामाची पोचपावती त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या रूपाने पक्षश्रेष्ठींकडून मिळाली आहे.

भाजपने गोवा विधानसभेची फेब्रुवारी २०२२ ची निवडणूक मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढविली. त्यात भाजपला २० जागा म्हणजे काठावरचे बहुमत मिळाले आहे. भाजपला हा विजय मिळवून देण्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांची सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अल्पावधीत केलेल्या चांगल्या कार्याची प्रशंसा केली आहे.

२०१२ मध्ये विधानसभेवर
मुख्यमंत्री डॉ. सावंत २०१२ साली गोवा विधानसभेवर प्रथम निवडून आले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांची गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावली.

२०१७ मध्ये सभापती
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. सावंत दुसर्‍यांदा निवडून आले. तेव्हा त्यांची गोवा विधानसभेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली.

२०१९ मध्ये मुख्यमंत्री
१७ मार्च २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर भाजप विधिमंडळ गटाच्या नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे डॉ. सावंत यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. गोव्याचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी १९ मार्च २०१९ रोजी शपथ घेतली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळल्यानंतर चार विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणूक पार पडली. त्यातील तीन मतदारसंघांत भाजपला विजय मिळवून देण्यात त्यांना यश मिळाले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या कार्यकाळात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. कॉँग्रेस पक्षाचे दहा आमदार आणि मगोपच्या दोन आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. गोवा विधानसभेतील भाजपचे संख्याबळ २७ पर्यंत नेण्यात आले.

दोन वर्षे महामारी
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या तीन वर्षांतील कार्यकाळातील दोन वर्षे कोरोना महामारीमध्ये गेली. राज्यातील खनिज व्यवसाय बंद असल्याने सरकारी महसुलात मोठी घट झाली. सरकारी महसूल वाढविण्यासाठी सरकारच्या विविध खात्यांना महसूल वाढीसाठी नवीन स्रोत हुडकून काढण्याची सूचना करावी लागली. कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक समस्या आणखी जटिल बनली. राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्याचा कारभार मोठ्या हिंमतीने हाताळला. केंद्र सरकारच्या सहकार्यातून आर्थिक समस्यांवर तोडगा काढण्यात यश मिळविले. कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवितहानीमुळे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना टीकेला तोंड द्यावे लागले.

स्वयंपूर्ण गोवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही मोहीम कार्यान्वित केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना गावागावांत पोचवून नागरिकांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. दूध, भाजीपाला या सारख्या गोष्टींसाठी गोव्याला परराज्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पंचायत पातळीवर ‘स्वयंपूर्ण मित्र’ म्हणून सरकारी अधिकार्‍यांची नियुक्ती करून त्यांनी या मोहिमेला चालना दिली. भाजीपाला, दूध आदींचे उत्पादन गावागावांतून केले जाऊ शकते हे जनतेच्या मनावर बिंबवण्यात आले. गावागावांतील शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याचे काम सरकारी अधिकार्‍यांच्या मार्फत करण्यात आले.

सरकार तुमच्या दारी
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांनी ‘सरकार तुमच्या दारी’ मोहीम राबविली.
आता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना राज्याच्या विकासात योगदान देण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात मनुष्य आणि साधनसुविधांच्या विकासावर भर देण्यात आला. आगामी काळात राज्यात भ्रष्टाचारमुक्त, स्थिर आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा मनोदय मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा २.०’ मोहीम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘नव भारत, नव गोव्या’चे स्वप्न साकारण्यासाठी प्राधान्य देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.