राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा या उपक्रमाची देशातील इतर राज्यांनी दखल घेण्यास सुरुवात केली आहे. गुजरात, उत्तराखंड या दोन राज्यांतील पथकांनी स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊन स्वयंपूर्ण मित्र, नोडल अधिकारी, स्वयंसेवा गट आणि इतरांशी संवाद साधला आहे, अशी माहिती नियोजन व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक सक्सेना यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला अनुसरून स्वयंपूर्ण गोवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वयंपूर्ण गोवा पहिल्या टप्प्यातील उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून दुसर्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या पंचायत सचिवांसोबत घेण्यात आलेल्या एका बैठकीत उपक्रमाला चालना देण्यावर विचारविनिमय करण्यात आला. राज्यात सरकार तुमच्या दारी हा कार्यक्रम लवकरच राबविला जाणार आहे, असेही सक्सेना यांनी सांगितले.