स्वप्न भंगले

0
13

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यापासून अवघी दोन पावले दूर असताना 50 किलो वजन गटातील भारताचे आशास्थान ठरलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्याच्या जागतिक ऑलिम्पिक संघटनेच्या निर्णयाने जणू एकशे चाळीस कोटी भारतीयांवर वज्राघात झाला आहे. तिचे वजन पात्रतेपेक्षा केवळ काही ग्रॅमनी अधिक भरले हे ह्या अपात्रतेचे कारण आहे. ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेचे नियम फार कडक असतात ह्याची विनेशला कल्पना नव्हती असे नव्हे. यापूर्वीच्या दोन ऑलिम्पिकमध्ये ती सहभागी झालेली असल्याने तिला आपले वजन प्रमाणात राखणे किती महत्त्वाचे असते हे पुरेपूर ठाऊक होते. परंतु लागोपाठ तीन कुस्त्या लढून तिन्हींत शानदार विजय संपादित करणाऱ्या विनेशचे वजन त्या दरम्यान प्यायलेल्या कार्बोहायड्रेटस्‌‍मुळे दोन किलोंनी वाढले. हे वजन कमी करण्यासाठी तिने रात्रभर न झोपता भरपूर व्यायाम केला. वाढलेले वजन फार मोठ्या प्रमाणात म्हणजेच एक किलो 85 ग्रॅमनी खालीही आले. परंतु काल सकाळी झालेल्या वजन तपासणीत तरीही ते 50 किलोंपेक्षा शंभर ग्रॅम जास्त भरले आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या कडक नियमांनुसार तिला थेट अपात्र ठरवण्यात आले. केवळ सुवर्ण अथवा रौप्यपदक हुकले एवढेच ह्यातून घडलेले नाही, तर ऑलिम्पिक्सच्या नियमानुसार, जो स्पर्धक अपात्र ठरतो, त्याला सगळ्यात शेवटच्या क्रमावर ढकलले जात असल्याने विनेशने अंतिम फेरीपर्यंत मजल मारण्यासाठी संपादन केलेल्या सर्व शानदार विजयांवरही विरजण पडले आहे. विनेशने खरोखर ह्या ऑलिम्पिकमध्ये कमाल केली होती. पहिल्याच कुस्तीत तिने गेल्यावेळच्या जपानमधील टोकयो ऑलिम्पिकची विजेती व जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी असलेली कुस्तीपटू युई सुसाकीला पात्रता फेरीतच पराभूत करण्याचा चमत्कार घडवला होता. स्वतः सुसाकीही विनेशचा तो अचाट पराक्रम पाहून अचंबित झाली होती. उपउपांत्य फेरीत विनेशने युक्रेनच्या साना लिवाचला दणका दिला, तर उपांत्यफेरीत क्युबाच्या युसनेलोस गुझमानला पराभूत करून भारतीय जनतेच्या पदकाच्या आशा प्रज्वलित केल्या होत्या. परंतु एका रात्रीत सगळे होत्याचे नव्हते झाले. फोगाटच्या सुवर्णपदकाच्या प्रतीक्षेत असलेल्या देशाला हा जबर धक्का आहे. विनेशच्या अपात्रतेची बातमी येताच पंतप्रधानानी त्वरित भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रमुख पी. टी. उषा यांना ह्यासंदर्भात दाद मागण्यास सांगितले. परंतु ऑलिम्पिकच्या कडक नियमांमुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या हाती काही उरले नव्हते. शिवाय नाही म्हटले तरी भारताबाबत वर्णद्वेषी वृत्तीही अशा बाबतींत दिसते ती वेगळीच. त्यात ह्या सगळ्या प्रकरणाला सरकारपक्षातील ब्रिजभूषणशरणसिंगविरुद्धच्या महिला कुस्तीपटूंच्या संघर्षाची पार्श्वभूमी असल्याने नाना शंका कुशंका जनतेच्या मनात डोकावल्या. परंतु कोणताही देश किंवा नेता आपली स्पर्धक भले मग तिच्याशी कितीही मतभेद असोत, ती ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत सुवर्णपदकाकडे झेपावत असताना त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न कदापि करणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या कटकारस्थानाच्या वावड्यांना काही अर्थ नाही. एक प्रश्न मात्र जरूर उपस्थित होतो, तो म्हणजे अशा प्रकारच्या विशिष्ट वयोगटातील कुस्ती स्पर्धेत वजनाला अतोनात महत्त्व असल्याने ते प्रमाणात राखण्यास सर्वोच्च प्राथमिकता असते. मग येथे सुवर्णपदकासाठी कुस्ती लढणार असलेल्या विनेशचे वजन एवढे प्रचंड प्रमाणात वाढू कसे दिले गेले? ते कमी करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तो तोकडा पडला हेही दिसले. त्यामुळे तिच्यासोबत गेलेले आहारतज्ज्ञ आणि प्रशिक्षक हे तिच्याहून या प्रकरणात अधिक दोषी ठरतात. कुस्तीपटूंचे वजन वाढणे किंवा कमी होणे हे अगदी स्वाभाविक असते, परंतु पुढील महत्त्वाचा मुकाबला लक्षात घेऊन ते एवढे प्रमाणाबाहेर वाढणार नाही की कमीही करता येऊ नये ह्याची खबरदारी घेणे ही तिच्यासमवेतच्या प्रशिक्षकांची आणि आहारतज्ज्ञांची जबाबदारी होती. त्यात ते कमी पडले. वजन तब्बल दोन किलोंनी वाढलेले दिसल्यानंतर मात्र ते कमी करण्याचे रात्रभर प्रयत्न झाले, परंतु सकाळीच दुसरी वजन तपासणी असल्याने त्याला उशीर झाला होता. शेवटी नियम हे नियम असतात आणि ते आंधळे असतात. त्यामुळे तिला वजन घटवण्यासाठी आणखी वेळ दिला पाहिजे होता वगैरे म्हणण्याला काही अर्थ उरत नाही. विनेश यापूर्वीच्या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये 53 किलो गटात व यंदा त्या गटात अंतिम पंघाल पात्र ठरल्याने विनेश 50 किलो गटात उतरली होती. मात्र विनेशचे आणि भारताचे दुर्दैव आड आले आहे असेच यासंदर्भात म्हणावे लागेल. जे घडले ते पुन्हा घडू नये याची खबरदारी सर्व स्पर्धकांनी घेणे एवढेच आता आपल्या हाती आहे.