स्वप्नांचे शरीरमनावर होणारे परिणाम

0
677
  • डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
    (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)

मनुष्य आपल्या जीवनाचा एक तृतीयांश काळ हा झोपेमध्ये व्यतीत करतो आणि बहुतेक वेळी या झोपेमध्ये स्वप्न पडणे हे साहजिक आहे. निरोगी माणसांना ही स्वप्न खूप कष्ट देतात, जीवन संशययुक्त होते व रोगीना मृत्यूसुद्धा देऊ शकतात.

जसा झोपेचा शरीरावर व मनावर परिणाम होतो तसाच स्वप्नांचादेखील खूप प्रमाणात परिणाम होत असतो. डोळे उघडे ठेवून जे स्वप्न बघतो ती कल्पना असते व डोळे बंद करून झोपेत बघितले जाते ते स्वप्न असते. मी आज कुठलेही स्वप्न बघणार नाही किंवा मला कुठचेही स्वप्न पडणार असे आपण ठरवू शकत नाही. हे आपल्या हातात नसते. स्वप्न टाळण्याकरिता मनुष्य झोपेविना राहू शकत नाही. झोप ही शरीराची गरज आहे ज्यावर शरीर टिकून आहे व ती सतत न मिळाल्यास मृत्यू अटळ आहे. मनुष्य आपल्या जीवनाचा १/३(एक तृतीयांश)काळ हा झोपेमध्ये व्यतीत करतो आणि बहुतेक वेळी या झोपेमध्ये स्वप्न पडणे हे साहजिक आहे.

याचे ७ प्रकार सांगितले आहेत.
१) दृष्ट – जे आपण प्रत्यक्ष बघितले आहे व झोपण्यापूर्वी त्याच्याच विचार केला आहे तेच स्वप्नात दिसणे. त्या एखाद्या गोष्टीबद्दल जास्त ताणतणाव असणे किंवा चिंता असणे हे याचे कारण असू शकते. या स्वप्नाचे काहीही सार्थक होत नसते न काही फळ मिळते.
२) श्रुत – जे आपण ऐकतो मग ते टीव्हीवरील एखादी बीभत्स ध्वनिफीत असेल किंवा कोणी बोललेली/सांगितलेली गोष्ट त्याच्याबद्दल स्वप्न येणे.
३) अनुभूत – जागृत अवस्थेमध्ये इंद्रियांद्वारे ज्याचा अनुभव मिळालेला आहे व जी गोष्ट मनाला स्पर्श करून गेली असेल, मनावर प्रभाव पडला असेल त्याच गोष्टीची स्वप्नामध्ये परत पुनरावृत्ती होणे.
४) प्रार्थित – जागृत अवस्थेमध्ये एखाद्या इच्छापूर्तीसाठी केलेली देवदेवतांची पूजा- अर्चना- प्रार्थना आणि तीच इच्छा पूर्ण होताना स्वप्नात दिसणे म्हणजेच प्रार्थित स्वप्न.
५) कल्पित – जागे असताना मनुष्य मनामध्ये जी कल्पना करतो तीच स्वप्नामध्ये साकार होताना दिसते पण प्रत्यक्षात वस्तुस्थितीत मात्र शक्य नसते.
६) भाविक – अशी चित्रविचित्र स्वप्ने जी ना बघितली गेली न कधी ऐकू आली, जी भविष्यातील घटनांचा पूर्वाभास करेल. कर्मांचे फळ (शुभ-अशुभ) म्हणून ही स्वप्ने पडतात असे म्हटले जाते.
७) दोषज – शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) यांच्या स्थितीनुसार (प्रकोप) मनावर परिणाम होऊन स्वप्न पडतात व व्याधी उत्पन्न होतो.
आयुर्वेद शास्त्रानुसार खालील काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत

  • वरील पहिली ५ प्रकारची स्वप्ने निष्फल असतात, यांचे काहीही फळ मिळत नाही.
  • दिवसा पडलेले स्वप्न, खूपच लहान व खूपच मोठे स्वप्न (रात्रीचे सुद्धा व्यर्थ, निष्फळ असते.
  • रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये पडलेले स्वप्नाचे फळ अल्प असते.
  • जे स्वप्न पडल्यानंतर पुन: झोप येत नाही ते फलदायी असते.
  • जो व्यक्ती अशुभ स्वप्न बघितल्यावरसुद्धा पुन: सौम्य किंवा शुभ स्वप्न पाहतो, त्याचे फळ शुभ असते.
    स्वप्न या आठवणी साठविण्यास महत्त्वाच्या ठरतात. तरीही अशी काही स्वप्ने आहेत जी अशुभ मानली जातात. जशी की
  • ज्यांच्या स्वप्नात स्वतःच्या केसांवर झाडांच्या फांद्या, वेलींपासून जटा व घरटी उत्पन्न होऊन त्यामध्ये पक्षी राहण्याचा आभास होतो
  • जो स्वप्नात गिधाड, घुबड, कावळा, कुत्रा, राक्षस, प्रेत, पिशाच, स्त्री, चांडाळसारख्यांनी वेढलेला आहे.
  • जो स्वप्नात वेली, बांबू, गवत, कांटे यांच्यामध्ये फसून उरलाय व जेवढा त्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्न करतोय तेवढाच अजून आत फसत चाललाय व पुन: पुन: खाली पडतोय.
  • जो स्वप्नात धुळीने व्यापलेली जमीन अथवा रेतीच्यावर, राखेच्या ढीगारयात, स्मशानभूमीत, खड्‌ड्यात पडलेला असतो.
  • जो स्वप्नात दूषित जल, चिखल किंवा काळोख असलेल्या विहिरीत बुडतो, नदीच्या प्रवाहात वाहून जातो.
  • स्वप्नात पंचकर्मातील स्नेहपान, अभ्यंग, स्नेहयुक्त वमन-विरेचन हे अनुभवतो, ज्याला स्वर्णाची प्राप्ती होते, बांधलेला असतो, नेहमी भांडतो व हरतो, .
  • स्वप्नात ज्याचे पादत्राण/चप्पल चोरीला जाणे, पायाच्या मांसाचा तुकडा पडणे, पितरांकडून तिरस्कृत होणे.
  • स्वप्नात चंद्र, सूर्य, नक्षत्र, देवता, दीप, दात, डोळे खाली पडणे, नष्ट होणे, डोंगर कोसळणे.
  • स्वप्नात लाल फुलांच्या वनात, रक्त पडलेली जमीन, पापकर्म केलेले स्थान, चिता-अन्धकारयुक्त गुहेत प्रवेश करणे.
  • स्वप्नात गळ्यामध्ये लाल फुलांची माळा घालून, मोठ्या आवाजात हसणे व नग्न होऊन दक्षिण दिशेला जाणे किंवा घनदाट वनात माकडांसोबत जाणे.
  • स्वप्नात केशरी रंग, रागीट- नग्न- दंडधारण केलेला लाल डोळ्यांचा काळा पुरुष दिसणे.
  • स्वप्नात काळी, पापी, निशाचर, लांब केस- नख- स्तनांची, वैरागी, माळा घातलेली स्त्री दिसणे हे लक्षण कालरात्री समान असते.
    निरोगी माणसांना ही स्वप्न खूप कष्ट देतात, जीवन संशययुक्त होते व रोगीना मृत्यूसुद्धा देऊ शकतात.