दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना खास पत्र
भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जात आहे. या दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत देशवासियांना एक खास पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून मोदींनी जनतेशी संवाद साधत दिवाळीचा सण ऊर्जा, उत्साह आणि देशाच्या कामगिरीवर चिंतन करण्याचा काळ असल्याचे म्हटले आहे. मोदींनी पत्राच्या माध्यमातून देशवासियांना फक्त दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, तर एक खास आवाहनही केले आहे. स्वदेशीचा स्वीकार करा, आरोग्याला प्राधान्य द्या, असे आवाहन त्यांनी केले.
दिवाळीच्या सणाच्यानिमित्ताने तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा. अयोध्येत राम मंदिराच्या भव्य बांधकामानंतरची ही दुसरी दिवाळी आहे. भगवान श्री राम आपल्याला धार्मिकतेचे रक्षण करायला शिकवतात, तसेच अन्यायाविरुद्ध लढायलाही शिकवतात. याचे एक ज्वलंत उदाहरण आपण काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाहिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने अन्यायाचा बदला घेतला, असे मोदींनी पत्रात म्हटले आहे.
मोदींनी पुढे म्हटले आहे की, ही दिवाळी खास आहे कारण देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये, दुर्गम भागात पहिल्यांदाच दिवाळीचे दिवे लावले जातील. हे असे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी नक्षलवाद आणि माओवाद्यांचा नायनाट करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात आपण पाहिले असेल की किती नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. त्यांनी देशाच्या संविधानावर विश्वास व्यक्त केला आहे ही देशासाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे.
अनेक संकटांचा सामना करणाऱ्या जगात आपला भारत स्थिरता आणि संवेदनशीलतेचे प्रतीक म्हणून ठाम उभा आहे. भविष्यात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सज्ज आहोत. विकसित आणि स्वावलंबी भारताच्या या प्रवासात नागरिक म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी राष्ट्राप्रती असलेली आपली कर्तव्ये पार पाडणे आहे. आपण स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे आणि अभिमानाने सांगितले पाहिजे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे, स्वच्छतेचे पालन केले पाहिजे, आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही मोदींनी म्हटले आहे.