डॉ. सीताकांत घाणेकर
योगसाधना: 662 – अंतरंग योग – 248
कायदा आपले काम करीलच, पण मुख्य म्हणजे विश्वात जे विविध विकृत अत्याचार होतात ते सर्व बंद झाले पाहिजेत. जेव्हा अशा घटना स्वतःच्या कुटुंबात घडतात तेव्हा त्याचे महत्त्व कळते. समाजधुरिणांनी अशा विषयांवर सूक्ष्म चिंतन करायला हवे.
सर्व विश्वात वेळोवेळी विविध विषयांची चर्चा होते- त्या त्या वेळच्या घटनांप्रमाणे. काही वर्षांपूर्वी जग कोरोनाच्या जबड्यात सापडले होते. हजारो लोक मृत्युमुखी पडले. एरव्ही लढायांत गुंतलेले जग एकत्र आले. चर्चासत्रे झाली. जिवाणूवर सखोल संशोधन झाले. वेगवेगळे उपाय अमलात आणले गेले- मुखपट्टी, निर्जंतुकीकरण, लस… शेवटी काही काळानंतर बुद्धिमान मानवाने संकटावर मात केली. हा रोग आटोक्यात आला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला!
एवढ्यात यासंदर्भात एक नवीनच समस्या उभी राहिली. अनेकांना हृदयरोग दिसून आला. त्यात तरुण व्यक्तीदेखील आहेत. प्रत्येक घटनेला वेगवेगळी कारणे शोधण्यात आली. त्यात एक मत म्हणजे कोरोना व्हॅक्सीन. संशोधनांती नक्की उत्तर सापडेल अशी आशा करूया.
मधेमधे विविध विषयदेखील चर्चेत येतात. उदा. आतंकवाद, देशांमधील लढाया- हिंदुस्तान व पाकिस्तान, युक्रेन व रशिया, इस्रायल व पॅलेस्टाइन- हमास… तेवढ्यातच बांगलादेशची समस्या जगजाहीर झाली. सारांश काय? विश्वात शांती नाही…!
सर्व घटना वाईटच असतात असे नाही. मधेमधे आंतरराष्ट्रीय खेळजगताच्या चांगल्या बातम्यादेखील येतात. जागतिक योगदिन शेकडो देशांत लाखो योगसाधकांनी साजरा केला अशादेखील सकारात्मक बातम्या येतात.
एकत्रित राष्ट्रांचे पहिलेच बोधवाक्य होते- ‘समन्वय व शांतीसाठी योग.’ पण अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. तद्नंतर दरवर्षी वेगवेगळी ध्येयवाक्ये येतात- ‘तरुणांसाठी योग’, ‘कुटुंबासाठी योग’, ‘आरोग्यासाठी योग’ वगैरे. या वर्षीचे बोधवाक्य तर अतिशय सुंदर आहे- ‘वसुधैव कुटुंबकम्.’
बोधवाक्ये बोध देणारी असतात. पण त्याप्रमाणे आचरण होत नाही. अपवाद अगदी थोडे असतील. सकारात्मक घटनांवर लक्ष देता देता नकारात्मक बातम्यादेखील चालूच असतात. त्यात हल्लीच घडलेली एक अत्यंत दुःखदायक, वेदनादायक घटना म्हणजे पश्चिम बंगालातील हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेले अत्याचार. या डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला व हॉस्पिटलच्या खोलीतच तिचा खूनही करण्यात आला. प्रत्येकजण हळहळला. अनेक संतप्त प्रतिक्रिया आल्या. निदर्शने झाली, संप झाले, बंद झाले… उच्च न्यायालयातदेखील चर्चा झाली. विविध उपाय सुचवले गेले, आणि परत सर्वजण आपापल्या कार्यात गुंतले…
अशावेळी विचार येतो तो म्हणजे, त्या मुलीच्या कुटुंबाचा. ते एक गरीब कुटुंब. पुष्कळ कष्ट सोसून त्यांनी मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवले. त्या मुलीनेदेखील मन लावून अभ्यास केला व डॉक्टर झाली. आणि अशावेळी त्या नराधमांच्या रूपाने नियतीने आपले विद्रूप रूप दाखवले. विचार केला तरी मनाला अत्यंत वेदना होतात. विचार येतो की अजूनपर्यंत गुन्हेगार सापडत कसे नाहीत? काहींच्या म्हणण्याप्रमाणे काही तथाकथित ‘महनीय व्यक्ती’ या घटनेत गुंतल्या आहेत. राजकीय हस्तक्षेप होतोय.
अशावेळी डॉ. परिणिता पावसकर यांचा एक संदेश माझ्या मोबाईलच्या गॅलरीत सापडला. तो संपूर्ण वाचला तर सत्यस्थिती कळेल. तो संदेश असा-
शिकवण्या फक्त तिलाच
ती शिकली नव्हती तेव्हाही
आज ती शिकून मोठी झाली तरीही
पदर पडू देऊ नकोस- मान वर करू नकोस
उंबरठ्याबाहेर जाऊ नकोस- चेहरा दाखवू नकोस
जास्त बोलू नकोस- मोठ्याने हसू नकोस
एकटी बाहेर जाऊ नकोस- जास्त वेळ बाहेर पडू नकोस
अंगप्रदर्शन करू नकोस- पुरुषांच्या भावना चाळवतील
असे कपडे घालू नकोस.
पण असे काय कपडे घातले होते-
- ड्युटीवर असणाऱ्या अभयाचे?
- गरोदर बिल्किस बानेोचे?
- साठ वर्षांच्या आजीचे- दोन वर्षांच्या चिमुरडेचे?
अजून किती वेळ तुम्ही तिलाच शिकवणार?
तिच्यावर झालेल्या अत्याचारांसाठी तिलाच दोषी ठरवणार?
तिला झालंय ते सगळं शिकवून
गूड टच- बॅड टच, कराटे, मार्शल आर्ट, पेपर स्प्रेही झाला
ती शिकली- सबळ झाली- सक्षम झाली
पण निर्भयानंतर बारा वर्षांनीही आज ‘अभया’ जन्माला आली.
का महितीये?
कारण गरजच नव्हती कधी तिला शिकवण्याची
गरज आहे ती त्याला घडवण्याची- संस्कार करण्याची
नजर सुधारण्याची- दृष्टिकोन बदलण्याची
याहीपेक्षा जास्त- मानसिकता बदलण्याची
तेव्हा तिला शिकवण्यापेक्षा-
शिकवा तुमच्या मुलाला, भावाला, भाच्याला
काका, मामा, मित्र, नवरा, सासऱ्याला
बापाला आणि आजालासुद्धा
कारण नातं कोणतंही असो-
ते विसरत नाहीत- त्याच्यातल्या पुरुषाला!!
घाणेरड्या नजरेनं नेहमीच पाहिलं
संधी मिळेल तेव्हा ओरबाडूनही काढलं
ठेचा अशा प्रवृत्तींना
वासनेच्या भुकेल्या नराधमांना
गाडा अशा विकृतींना- आणि
आठवा- छत्रपती शिवरायांना
कारण- बाईबद्दल जो वाकडा विचारही करतो
चिमुरड्या देहाला भ्रष्ट करतो
माझा राजा त्याचा चौरंगा करतो
आम्ही मात्र फक्त आंदोलने करतो
तो चॉकलेट गोळ्यांची आमिषे दाखवतो
आमचा नेता फक्त आश्वासने देतो
तो चरित्र्याचे तिच्या दहन करतो
आणि आमचा देश फक्त मेणबत्त्या जाळतो. - आता नकोत कोणती आश्वासने- नकोत
कोणत्या योजना
लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या
एवढीच काय ती प्रार्थना
आणि- लाडक्या भावाला धडे द्या
शिकवा थोड्या भावना
बाई म्हणून बघण्याआधी
आई म्हणून बघा
पुरुष म्हणून जमत नसेल ना
तर थोडं माणूस म्हणून बघा…
मुख्य गोष्ट म्हणजे हा संदेश फक्त लिहिलेला नाही तर एका तरुण मुलीने अत्यंत भावनाप्रधान बनून, पण वेळोवेळी कडकपणे हा संदेश सांगितला आहे.
खरंच दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. डॉ. परिणिताने अत्यंत विचारपूर्वक हा संपूर्ण संदेश लिहिला आहे.
कायदा आपले काम करीलच, पण मुख्य म्हणजे विश्वात जे विविध विकृत अत्याचार होतात ते सर्व बंद झाले पाहिजेत. जेव्हा अशा घटना स्वतःच्या कुटुंबात घडतात तेव्हा त्याचे महत्त्व कळते. समाजधुरिणांनी अशा विषयांवर सूक्ष्म चिंतन करून चर्चा करायला हव्यात.
योगसाधना करता करता मला एक उपाय सुचतो, तो म्हणजे, शास्त्रशुद्ध योगसाधना. स्वामी विवेकानंद स्वतः एक ब्रह्मचारी होते. त्याप्रमाणे ते आचरण करीत असत. त्यांच्या साहित्याचा अभ्यास करताना उपाय सहज सापडतो. त्यांची काही प्रख्यात बोधवाक्ये अत्यंत बोधक आहेत.
- तत्त्वज्ञानाशिवाय योगसाधना केली तर मूळ धरणार नाही. योगसाधनेशिवाय तत्त्वज्ञान शिकलो तर फळ मिळणार नाही.
- विश्वाला गरज आहे ती- पौर्वात्यांचे अध्यात्म, पाश्चिमात्यांचे तंत्रज्ञान.
- प्रत्येक आत्म्यात संभावित देवत्व आहे. ते प्रकट करणे हाच जीवनाचा हेतू आहे.
- मी त्या देवाचा सेवक आहे ज्याला सामान्य लोक मानव म्हणतात.
सारांश एकच- प्रत्येकात व स्वतःमध्ये देवत्व बघायचे. विश्वातील सर्व समस्यांना हेच एक उत्कृष्ट उत्तर आहे.