स्वतंत्र केडर : सप्टेंबरपर्यंत निर्णय

0
200

गोव्याचे आयएएस अधिकार्‍यांच्या वेगळ्या केडरसाठीची जी मागणी केलेली आहे त्यासंबंधी येत्या सप्टेंबरपर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत दिली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार पांडुरंग मडकईकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.
वरिष्ठ आणि कनिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांच्या एकूण किती जागा भरायच्या आहेत, असा प्रश्‍न मडकईकर यांनी उपस्थित केला होता. तसेच या जागा भरण्यासाठी बराच विलंब होतो आहे याची सरकारला कल्पना आहे काय, असा सवाल त्यांनी केला होता. ज्या जागा भरायच्या होत्या त्यासाठी यापूर्वीच लेखी परीक्षा झाली होती. मात्र, भरती प्रक्रियेत काही त्रुटी राहून गेल्याचे आढळून आल्याने आता नव्याने निवड प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
शैक्षणिक पात्रतेत आवश्यक बदल
यावेळी पुढे बोलताना पर्रीकर म्हणाले की वरील पदे भरताना बीसीए, बीबीए आदी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचा विचार होत नाही. त्यामुळे आता ही पदे भरताना असे अभ्यासक्रम केलेल्यानाही संधी मिळावी यासाठी शैक्षणिक पात्रतेत आवश्यक ते बदल करण्यात येतील. वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकार्‍यांच्या किती जागा भरण्याची गरज आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रतेत काय बदल आवश्यक आहेत त्याचा अभ्यास केला जात असल्याचे पर्सोनेल खात्याचे मंत्री या नात्याने बोलताना पर्रीकर यांनी स्पष्ट केले. वरील पदे भरण्यासाठी आता नव्याने जाहिरात देण्यात येणार असल्याचे यावेळी पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
आलेक्स रेजिनाल्ड यांचा आरोप
यावर आरोप करताना यापूर्वी या पदांसाठी मुलाखती दिलेल्यांना डावलण्यासाठीच हे केले जात असल्याचा आरोप आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केला. यावर उत्तर देताना पर्रीकर म्हणाले की त्याबाबत अनेकांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर सरकारने ती प्रक्रिया थांबवली. यावेळी अभ्यास केला असता काही वेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना संधी देण्याची गरज असल्याचे दिसून आल्याचे पर्रीकर म्हणाले. आता नव्याने मुलाखती घेताना त्यासाठी आवश्यक ते सगळे बदल करण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. उदाहरण देताना ते म्हणाले की वन खात्यातील पदे भरायची असतील तर रानविषयक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना तर पर्यावरण खात्यातील पदे भरायची असल्यास त्यासंबंधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यानांच संधी द्यावी लागते.