‘स्वच्छ भारत ….’ चे स्वप्नातील वास्तव!

0
137

– रमेश सावईकर
‘स्वच्छ भारत, निर्मळ गोवा’ मोहीमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजधानीत झाला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन जुनी जुंता हाऊस इमारत स्वच्छ करण्याच्या कामात सहभाग घेतला. त्यात नाविन्य ते काय? असा प्रश्‍न विचारला तर आश्‍चर्य वाटेल. पण आश्‍चर्य वाटण्यासारखे त्यात काहीच नाही. मंत्र्यांनी दीप प्रज्वलन, फीत कापून उद्घाटन करणे, त्याची छायाचित्रे वृत्तपत्रातून सविस्तर वृत्तांतासह प्रसिद्ध झालेली पाहणे, वाचणे हे काम तर वाचकांना करावेच लागते.
गोव्यात कचर्‍याचा प्रश्‍न तसा नवा नाही. शहरांत, ग्रामीण भागातल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात सरकारला अपयश आलेले आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ नि स्पष्टपणे जाणवणारी आहे. आता ‘स्वच्छ भारत, निर्मळ गोवा’ मोहीम फत्ते करून येत्या १९ डिसेंबरपर्यंत गोवा कचरामुक्त करण्याचा सरकारचा हेतू आहे. हा हेतू साध्य होवो अशी सदिच्छा!
आश्‍वासने आणि तीदेखील पूर्णत्वाची कालमर्यादा सांगणार्‍या तारखेसह जाहीर करणे हे आमच्या मंत्रीगणाचे वैशिष्ट्य आहे. किंबहुना तसा जणू रिवाजच पडला आहे म्हणा ना! रस्त्याची घोषणा असेल तर साधारणतः तीन-चार महिने, पुलाची घोषणा असेल तर एक-दोन वर्षे जमेस धरून ‘अमुक अमुक तारखेला अमुक शुभ मुहूर्तावर हा प्रकल्प लोकसेवेसाठी खुला..!’ अशी वृत्ते सर्रासपणे प्रसिद्ध होतात.
गेल्या दोन वर्षांत विविध क्षेत्रात क्रांती करण्याच्या घोषणांनाही तर अक्षरशः बहरच आला. हरित क्रांती, दुग्ध क्रांती वगैरे, वगैरे. गोवा राज्याचा विकास झालेला नाही असे मुळीच म्हणता येणार नाही. पण जे साध्य होते त्यापेक्षा त्याचा मोठा बाऊ करून आम जनतेला दाखवायचा नि आत्मसन्मानित व्हायचे ही सत्ताधार्‍यांची खासियत बनली आहे. त्याला कोणी मंत्री-आमदार अपवादासाठी वगळणे कठीण आहे.
आता २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हाती झाडू घेऊन स्वच्छता मोहीमेत सहभागी होणार आहेत. दरवर्षी गांधी जयंती दिनी स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात येऊन त्याची अफाट प्रसिद्धी होते. नंतर बाकीचे वर्षातील ३५९ किंवा ३६४ दिवस स्वच्छतेबद्दल हाती झाडू घेण्याची अशा प्रतिष्ठितांची तयारी नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक वादळ आहे. देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्याची ताकद त्यांच्यात आहे. तो एक झंझावात आहे. किनारा गाठण्याची क्षमता गाठणारी सक्षम लाट आहे. एवढेच नव्हे तर त्यांची जादूई कामगिरी, नवा करीष्मा.. अशा अनेक स्वरूपात सारा देश मोदीमय करण्याचे असीम राजकीय कार्य भारतीय जनता पक्ष नि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे. त्याबद्दल त्यांना कोणीही सलाम करावा! पण हे सारे चकाकणारे अस्सल सोनेच आहे का?
मोदी लाट ओसरू लागल्याचे संकेत काही राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाने दिले आहेत. पाकिस्तानबरोबर स्नेहसंबंधाची बोलणी करण्यात इकडे पंतप्रधान मोदी व्यस्त असताना तिकडे पाकचे सैनिक सीमारेषांवर गोळीबार करून आपल्या जवानांना धारातीर्थी पाडत आहेत. जवानांच्या जीवाचे मोल या राजकारण्यांना केव्हा कळणार असा नेहमीच मन विचारदग्ध करणारा प्रश्‍न आहे.
‘जय जवान, जय किसान’ हा नारा माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांनी लावला. त्यावेळी प्रत्यक्ष पूंच्छ व कच भागात भारतीय सैनिक जाऊन आपली मर्दुमकी गाजविली. पण आज तशी परिस्थिती नाही. जागतिक पातळीवर आपले नाव व्हावे म्हणून पाकिस्तान, चीन आदि शत्रूराष्ट्रांबरोबर मैत्रीची बोलणी करून हे नेते देशाचे काय भले साधणार आहेत याची नुसती कल्पनाच केलेली बरी. वादळ, झंझावात, लाट मग ती नैसर्गिक असो किंवा राजकीय ती निष्प्रभ व्हायला फारसा कालावधी लागत नाही. राजकीय नेत्यांच्या बाबत हे खरे ठरते. कारण त्यामागे विचारांची, निष्ठेची, तात्त्विक बैठक नसते. देशसेवा नि राष्ट्रभक्तीचे अधिष्ठान असत नाही. म्हणून सवंग प्रसिद्धी नि तकलादू लौकिक मिळविण्याच्या आसक्तीपायी ‘‘पंत जातात नि राव येतात’’ अशी सत्तेची परिक्रमा चालू राहते.
‘स्वच्छ भारत, निर्मळ गोवा’ ही मोहीम सुरू होण्यापूर्वीच सरकारी खर्चानं जाहिरातींद्वारा प्रसिद्धीचे वलय उभे करून काय साध्य होणार आहे? या राजकीय नेत्यांच्या अट्टाहासी नकली उपक्रमावरून कवी बा. भ. बोरकर यांच्या महात्मा गांधींवरील कवितेची आठवण झाली. म. गांधींबद्दल असलेल्या त्या कवितेत बोरकर म्हणतात,
‘‘हाती धरून झाडू, तू मार्ग झाडलासी,
स्पर्शे तुझ्या महात्म्या ये थोरवी श्रमासी.
तट धर्म कल्पनांचे उलथून पाडले तू
अविरुद्ध धर्मचक्रा दिधली पुन्हा गती तू’’
देशाला जो सत्याचा, अहिंसेचा, शांतीचा महामंत्र म. गांधींनी दिला तो त्यांनी प्रथम आचरणात आणला नि नंतर जनतेला सांगितला. आजचे नेते स्वतःला ‘महात्मा’ बनवू पाहात असले तरी ते असंभव आहे. म. गांधीजींचे ग्राम राज्याचे स्वप्न साकार करणे फार दूरवरचे ध्येय आहे. स्वच्छतेसाठी त्यांनी झाडू हातात घेतला नि श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ही जादूई किमया किंवा करिष्मा करून दाखवायचे स्वप्न उराशी बाळगण्यापूर्वी तथाकथित नेत्यांनी ‘महात्मा’ बिरूद सोडूनच द्या, देशाचे, राज्याचे सच्चे नेते अगोदर बनावे नि त्याची खात्री जनतेला पटवून द्यावी.
‘स्वच्छ भारत, निर्मळ गोवा’ मोहीम राबवून येत्या गोवा मुक्तीदिनी गोवा राज्य कचरामुक्त करण्याचा मानस पंतांनी व्यक्त केला आहे. राज्यातील नगरपालिकांनी कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारावेत अशी अट घालूनही त्याची पूर्तता होत नाही. डिचोली नगरपालिकेने कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करून इतर पालिकांना एक आदर्श घालून दिला आहे. राज्य सरकारची दक्षिण व उत्तर गोव्यासाठी दोन स्वतंत्र मोठे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची योजना रखडली आहे. ग्रामीण पंचायत विभागातही लोकांची वस्ती, घरे वाढल्याने कचर्‍याचे प्रमाण एवढे वाढले आहे की प्रत्येक पंचायतीने कचरा समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्रपणे योजना राबविली पाहिजे. अशी सध्याची परिस्थिती असताना १९ डिसेंबर २०१४ पर्यंत गोवा कचरामुक्त कसा काय होणार? ‘प्लॅस्टिक हटाव’ मोहीम उघडली. गोवा प्लॅस्टिकमुक्त बनविण्याची घोषणा झाली. पण प्लॅस्टिकचा वापर मात्र पूर्वीसारखाच चालू आहे. ज्या प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी आहे, त्याचे उत्पादन का थांबविण्यात येत नाही?.. हा खरा मूलभूत प्रश्‍न आहे.
गोवा मुक्त होऊन पन्नास वर्षे उलटून गेली, तरी काही मूलभूत प्रश्‍न तसेच आहेत. समस्या कमी होण्याऐवजी अधिक होत आहे. कारण प्रश्‍न, समस्या निपटून काढल्या, मागण्या पूर्णत्वास नेल्या तर आगामी निवडणुकांसाठी विषय कोठून मिळणार? मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत भल्या घोषणा कितीही होवोत, या प्रकल्पाचा विषय आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत तेवत ठेवण्याचे काम धुरंधर राजकीय नेते चोखपणे बजावल्याशिवाय राहणार नाहीत असे वाटणे साहजिक आहे.