‘स्वच्छ भारत’मुळे पर्यटनास चालना : श्रीपाद

0
88

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेस गोव्यात जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याचा विचार केल्यास पंतप्रधानांचे स्वप्न शंभर टक्के यशस्वी होईल, असे सांगून त्यामुळे गोव्यात पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल, असे केंद्रीय पर्यटनमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी काल आकाशवाणी, दूरदर्शन व करमळी रेल्वे स्थानकावर आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी सांगितले.
पर्यटक आरोग्याच्या बाबतीत नेहमीच सावध असतात. स्वच्छता मोहिमुळे येथील रस्ते, किनारे व अन्य भागातील कचरा काढणे शक्य झाले आहे. त्यामुळे पर्यटकांचीही गर्दी वाढू शकेल, असे ते म्हणाले. प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. शाळेत असतानाच मुलांच्या मनात स्वच्छतेचे महत्व बिंबविले पाहिजे. कचर्‍याची कशा पध्दतीने विल्हेवाट लावावी, याचा प्रत्येक नागरिकाने विचार केल्यास अनेक प्रश्‍न सुटू शकतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्र्यांनी काल करमळी रेल्वे स्थानकावरून स्वच्छतेची मोहीम सुरू केली. त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चार दिवसांपूर्वीच राजधानी पणजी शहर स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली होती.