- डॉ. सीताकांत घाणेकर
मुख्य म्हणजे – गोष्टीतील सत्यासत्यता बघायची नसते. तिचा सार पाहायचा असतो. त्यापासून बोध घ्यायचा असतो. धडा शिकायचा असतो. आणि त्यानुसार आचरणही करायचे असते. गोष्ट ऐकून विसरायची नसते.
दिवसेंदिवस सर्व विश्वात कोरोनाची आग झपाट्याने पसरत आहे. सर्व स्तरांवर प्रयत्न तर जोरात चालू आहेत – वैद्यकीय, राजकीय, प्रशासकीय (विविध स्तर व विभाग), विज्ञान (व्हॅक्सीन, औषधे)…. पण यश दृष्टिक्षेपात येत नाही. प्रत्येक राष्ट्रात, राज्यात, शहरात, गावात रुग्णांची संख्या वाढतेच आहे. पण हतबल होण्याची गरज नाही. काल रोगमुक्त होणार्यांची संख्यादेखील वाढते आहे. सध्या ती संख्या ६४% आहे. प्रत्येकाला त्यामुळे तेवढाच धीर येतो. त्यामुळे थोडे समाधान वाटते. पण निष्क्रिय होऊन प्रयत्न सोडून देता येत नाही. आणि तसे कुणी करणारही नाही- प्रत्येकजण जो या रोगाशी संबंधित आहे तो प्रयत्नशील राहणार.
या संदर्भात मला एका घटनेची आठवण येते…
* सन १९७३ – मी मणिपालच्या कस्तुरबा मेडिकल कॉलेजमध्ये शल्यचिकित्सेचे (एमएस) शिक्षण घेत होतो. कर्नाटकात पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. गोव्यातसुद्धा आहे. त्यावेळी सर्व पोट काढून टाकावे लागते. आज आहे तशी प्रगती तेव्हा झाली नव्हती. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर अनेक रोगी दगावत असत.
दर महिन्यात होत असलेल्या वैद्यकीय बैठकीमध्ये युनिटच्या डॉक्टरने त्यांनी केलेल्या या शस्त्रक्रियेसंबंधी माहिती सादर करताना म्हटले की आपल्या युनिटमध्ये रोगी दगावण्याची संख्या कमी झाली आहे. आता ती ३-४% आहे. पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपले परिणाम आहेत.
तसे पाहिले तर ही घटना चांगलीच होती व सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. आमचे ‘चीफ ऑफ सर्जरी’ होते त्यांनीदेखील कौतुक केले. पण… ते पुढे म्हणाले की आमचा एकही रोगी या शस्त्रक्रियेमुळे दगावत नाही. तुम्हाला यश मिळावे ही मी प्रार्थना करतो. कारण आमच्यासाठी जरी ही संख्या ३-४% असली तरी त्या रुग्णाच्या कुटुंबासाठी ती १००% असते.
सारांश काय?- तर या यशामुळे आनंदित होऊन निष्क्रिय व्हायचं नसतं. ध्येय उच्च ठेवून प्रयत्न चालूच ठेवायचे. संशोधन चालू ठेवायचे. विज्ञानाची प्रगती त्यामुळेच होते. आज सर्व प्रकारच्या कर्करोगांचे प्रमाण जरी वाढले आहे (त्याला कारणेही तशीच आहेत), तरी रोगी बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन प्रगती होते आहे – जसे शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, किमोथेरपी (औषधे), इम्युनोथेरपी…
मानव तसा फार बुद्धिमान प्राणी आहे. तसा कर्तृत्ववान आहे. त्याला यश मिळेलच. निरुत्साही व्हायची गरज नाही.
सामान्य माणूस जरा चिंतेत पडतो कारण त्याला आजूबाजूला काय चाललेय हे स्पष्ट दिसते. पण त्याने लक्षात ठेवायला हवे की या सर्व घटनांना आपणच जबाबदार आहोत. शेवटी कर्माचे फळ भोगावेच लागते. पण वेळोवेळी जशा सूचना प्रसारित केल्या जातात, त्या प्रत्येक व्यक्तीने त्याप्रमाणे बंधने पाळून वर्तन करायला हवे. आता जर बंधनाबद्दल चीड आहे तर विनाशाला तयार व्हायलाच हवे.
प्रत्येकाचे कर्तव्य एकच आणि ते अगदी सोपे आहे.
१. ‘मास्क’, २. सामाजिक अंतर, ३. हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ करणे – इथे कसलीही सवलत मिळणार नाही. आपण नियमांचे पालन करायचे. तसेच इतरांनाही सांगायचे, समजावून सांगायचे- अगदी दोन्ही हात जोडून, नमस्कार करून नम्रपणे विनंती करायची. अनेकवेळा ती व्यक्ती ओळखीची नसते किंवा फार मोठी ‘बडी आसामी’ असू शकते. निदान त्यांची तरी तशी समजूत असते. आता थोडा राग पत्करावा लागेल पण स्वतःच्या व मानवतेच्या कल्याणासाठी एवढे थोडे तरी करावे लागणारच.
आपल्यापुढे उदाहरणे आहेतच…
१. रामायणात सेतुबांधणीवेळी एका छोट्याशा खारीने थोडी थोडी माती – आपल्या पाठीवर येईल तेवढी- घालून श्रीरामाची सेवा केली. ती रामाची लाडकी झाली. तिच्या पाठीवर म्हणे रामाची बोटे उमटली. भगवंत बरोब्बर भक्तीतील प्रामाणिकपणा व भाव बघतो.
२. इंद्राची मस्ती जिरवण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला. प्रत्येक गुराख्याने मात्र आपली काठीही अवश्य लावली.
३. पाच पांडव – शंभर कौरव; महान योद्धे कौरवांच्या पक्षात- पांडवांचे सैन्य सात अक्षौहिणी व कौरवांचे अकरा – पण श्रीकृष्ण सत्याच्या, धर्माच्या, न्यायाच्या बाजूने. मग जय कुणाचा होणार हे निश्चित!
– आपण जरी लहान असलो तरी कुणाचीही भीती न बाळगता आपले कर्तव्य करू या.
– स्वतः बंधने पाळू या.
– इतरांना सांगू या.
भगवंत तरी आमच्या सत्कर्मांची नोंद ठेवतील.
लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते…..
* एक फार मोठे घनदाट जंगल होते. तिथे सर्व तर्हेचे प्राणी, पशू-पक्षी आनंदाने राहत होते. पण एक दिवस अचानक जंगलाला आग लागली. झपाट्याने वाढू लागली. जीव वाचवण्यासाठी सर्व प्राणी दूर पळून जाऊ लागले. फक्त एक चिमणी सोडून…
मग ती काय करीत होती? नदीकडे जायची, चोचीत पाणी भरायची आणि आगीवर ओतायची.
तसे वरचेवर पाहिले तर हा वेडेपणाच म्हणायचा. कारण एवढी मोठी आग – मोठा वणवाच तो – तिच्या पाण्याने थोडीच विझणार!
सर्वांनी तिची थट्टा करायला सुरुवात केली. तिला मूर्ख ठरवले. पण तिने सांगितले…
‘‘या वृक्षांवर माझ्या अनेक पिढ्यांनी घरटी बांधली. आता त्यांना आग लागली तर त्यांना मी सोडून जाऊ? मी कृतज्ञ आहे, कृतघ्न नाही! हे वृक्ष उडून जाऊ शकत नाहीत. मला माहीत आहे की माझ्या पाण्याने आग विझणार नाही. पण भविष्यात जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी माझ्या बलिदानाची गोष्ट नक्की सांगितली जाईल. तुम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर खुशाल निघून जा.’’
हे ऐकून सगळी जनावरे ओशाळली. प्रत्येकाने थोडे थोडे पाणी आणले. हत्तींनी तर उत्तमच कार्य केले. आपल्या सोंडेतून पाणी आणून त्या आगीवर फवारा मारला… अग्निशामक दलासारखा.
आणि काय आश्चर्य? थोड्याच अवधीत आग आटोक्यात आली. सर्वांचे जीव वाचले.
मुख्य म्हणजे – गोष्टीतील सत्यासत्यता बघायची नसते. तिचा सार पाहायचा असतो. त्यापासून बोध घ्यायचा असतो. धडा शिकायचा असतो. आणि त्यानुसार आचरणही करायचे असते. गोष्ट ऐकून विसरायची नसते.
आपल्यासाठी जिवंत उदाहरणेही देता येतील –
१. महाभारत कथेतील सुभद्रा- अर्जुनपुत्र – तरुण अभिमन्यू.
– चक्रव्यूहात आत जाण्याची माहिती असलेला पण बाहेर कसे यायचे याचे ज्ञान नसलेला. तरीही संस्कृतीप्रेमापोटी चक्रव्यूहात शिरला- अगदी जिवावर उदार होऊन. स्वतःच्या जिवाचे बलिदान दिले. अमर झाला.
कोणी म्हणेल.. या सर्व गोष्टी आहेत. सत्य नाही.
इतिहासातील सत्य घटना बघू या….
२. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात अनेकांनी बलिदान दिले. पण एक नाव तार्यासारखे चमकले – भगतसिंग.
३. परवा कारगिल दिवस झाला. त्या युद्धात कितीतरी शूर-वीर सैनिकांनी मातृभूमीसाठी स्वतःचे बलिदान दिले. स्वतःच्या जिवाची पर्वा केली नाही.
आज सर्व विश्वांत कोरोनाची आग झपाट्याने पसरते आहे. त्याच्याबरोबर महावीरांचे युद्ध सुरू आहे. – वैद्यकीय व्यक्ती, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, मिडिया, सफाई कामगार… ते त्यांचे कर्तव्य करतात. आम्हाला युद्धामध्ये जायची गरज नाही. फक्त बेजबाबदार व्यक्तींना त्यांच्या मर्जीविरुद्ध समजावयाचे आहे- त्यांचा रोष पत्करून.
मी प्रत्येक दिवशी हे छोटेसे कार्य नियमित करतो. काहीजण ऐकतात. काही ऐकत नाहीत. पण मला आंतरिक शांती मिळते. कारण….
मी माझे कर्तव्य केले आणि करतोय. मला खात्री आहे की योगसाधकांची आत्मशक्ती नक्कीच वाढलेली आहे. ते आपला खारीचा वाटा उचलतील. आपले कर्तव्य करतील.