स्मिथची दुसर्‍या स्थानी झेप

0
111

प्रगतीपथावर असलेल्या ऍशेस मालिकेतील तीन डावांत ३७८ धावा कुटलेल्या स्टीव स्मिथ याने काल सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडच्या केन विल्यमसन याला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळविला आहे.

अव्वलस्थानावरील कोहली व स्मिथ यांच्यात केवळ ९ गुणांचे अंतर आहे. दुखापतीमुळे स्मिथ तिसर्‍या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. तसेच भारत व विंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या काही दिवसांत सुरुवात होणार असल्याने कोहलीला अंतर वाढविण्याची संधी असेल. कसोटी क्रिकेटमधील पहिला कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून उतरलेल्या मार्नस लाबुशेन याने १६ स्थानांची उडी घेत ८२वे स्थान प्राप्त केले आहे. आर्चरचा चेंडू हॅल्मेटला लागूनही टिच्चून फलंदाजी करत ५९ धावांची मौल्यवान खेळी केल्याचे फळ लाबुशेनला मिळाले आहे. इंग्लंडच्या दुसर्‍या डावात १६५ चेंडूंत ११५ धावांची खेळी केलेल्या बेन स्टोक्स याने ३२व्या स्थानावरून २६व्या स्थानी उडी घेतली आहे. एजबेस्टन कसोटीतील शतकानंतर लॉडर्‌‌सवर इंग्लंडच्या पहिल्या डावात ५३ धावा जमवलेल्या रॉरी बर्न्स याने १७ स्थानांची प्रगती साधत ६४वे स्थान आपल्या नावे केले आहे.

दुसरीकडे श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने टॉप १० मध्ये प्रवेश करताना आठव्या स्थानी झेप घेतली आहे. गॉल कसोटीच्या चौथ्या डावात १२२ धावांची चिवट खेळी करत त्याने लंकेला विजय मिळवून दिला होता. याच कसोटीत सहा बळी घेतलेला न्यूझीलंडचा डावखुरा संथगती गोलंजाज ऐजाझ पटेल याने गोलंदाजांच्या यादीत ६१वा (+ १४) क्रमांक प्राप्त केला आहे. अन्य गोलंदाजांचा विचार केल्यास इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर याने ८३व्या स्थानासह गोलंदाजी क्रमवारीत प्रवेश केला. तर डावखुरा फिरकीपटू जॅक लिच याने आठ स्थानांनी वर सरकताना ४०वे स्थान मिळविले. गॉल कसोटीच्या पहिल्या डावात ५ बळी घेतलेला अकिला धनंजया ३६व्या स्थानी आहे. लॉडर्‌‌स कसोटीत ९६ धावांत ६ बळी घेतलेल्या पॅट कमिन्स याने कारकिर्दीतील सर्वाधिक ९१४ गुणांसह आपला पहिला क्रमांक अधिक बळकट केला आहे.