आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल जाहीर केलेल्या जागतिक कसोटी क्रिकेट क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने फलंदाजांच्या यादीत तिसर्या स्थानी झेप घेतली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपली पहिले स्थान राखले आहे. तर दुसर्या स्थानी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आहे.
ऑस्ट्रेलियाने बर्मिंगहॅम येथे झालेल्या ऍशेस क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला २५१ धावांनी पराभूत करीत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामान्यात वर्षभराच्या बंदीनंतर दमदार पुनरागमन करताना स्टीव्ह स्मिथने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलताना पहिल्या डावात १४४ तर दुसर्या डावात १४२ धावांची शतकी खेळी केली. याच दोन शतकांचा लाभ स्मिथला आपली रँकिंग सुधारण्यात झाला असून त्याने भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला खाली खेचत थेट तिसर्या स्थानी झेप घेतली. काल घोषित करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार स्मिथचे ९०३ गुण झाले आहे. चेतेश्वर पुजारा ८८१ गुणांसह चौथ्या स्थानी घसरला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली ९२२ गुणांसह अव्वल अव्वल स्थानी आहे. तर केन विल्यमसन ९१३ गुणांसह तिसर्या स्थानी आहे. हेन्री निकोल्स (न्यूझीलंड, ७७८), ज्यो रूट (इंग्लंड, ७४१), डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया, ७२१), आयदेन मारक्रम (दक्षिण आफ्रिका, ७१९), क्वींटन डी कॉक (दक्षिण अफ्रिका, ७१८), फाफ डु प्लेसिस (दक्षिण आफ्रिका, ७०२) हे अनुक्रमे ५ ते १०व्या क्रमावर आहेत. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा ६१३ गुणांसह चौदाव्या स्थानी आहे. अजिंक्य रहाणे २१व्या स्थानी, लोकेश राहुल ४४व्या तर शिखर धवन ५०व्या स्थानी आहे. सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स ८१व्या स्थानी पोहोचला आहे.
दरम्यान, गोलंदाजांच्या क्रमवारीत नॅथन लीयॉनने ६ स्थानांची झेप घेताना १३व्या स्थानी पोहोचला आहे. लीयॉनने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावताना सामन्यात ९ गडी टिपले होते. त्याचा फायदा त्याला झाला. त्याचे ७३२ गुण झाले आहे. दुसर्या डावात ४ गडी मिळविलेला दु्रतगती गोलंदाज पॅट कमिन्स (८९८) याने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात ग्लेन मॅक्ग्रा आणि शेन वॉर्ननंतर कमिन्स हा सर्वाधिक रेटिंग मिळविणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा ८५१ गुणांसह दुसर्या तर इंग्लंडचा जेम्स अँडरसन ८३१ गुणांसह तिसर्या स्थानी आहे. वेर्नोन फिलँडर (दक्षिण आफ्रिका, ८१३), नील वॅग्नर (न्यूझीलंड, ८०१), रवींद्र जडेजा (भारत, ७९४), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड, ७८७), मोहम्मद अब्बास (पाकिस्तान, ७७०), जेसन होल्डर (वेस्ट इंडीज, ७७०) आणि रविचंद्रन अश्विन (भारत, ७६३) हे अव्वल दहात असलेले अन्य सहा गोलंदाज आहेत.