– दिलीप प्रभावळकर (ज्येष्ठ अभिनेते)
स्मिता तळवलकरबरोबर काम करण्याची संधी अनेकदा मिळाली. कलाकार आणि निर्माती अशा दोन्ही भूमिका स्मिताने यशस्वीपणे बजावल्या. स्मिताची निर्मिती असणार्या ‘चौकट राजा’ या चित्रपटात मला एक महत्त्वाची भूमिका करायला मिळाली. खरे तर यात मी स्मिताच्या पतीची भूमिका करणार होतो. परंतु आयत्या वेळी दुसरी भूमिका देण्यात आली. अर्थात, स्मिताची ही निवड किती योग्य होती हे त्या भूमिकेला लाभलेल्या लोकप्रियतेवरून प्रत्ययास आले. वृत्तनिवेदिकेपासून कारकिर्दीची सुरूवात करून अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका या सार्या आघाड्यांवर स्मिताने स्वतंत्र ठसा उमटवला. सकारात्मक दृष्टीकोन हे स्मिताच्या स्वभावाचे मुख्य वैशिष्ट्य होते. ती या क्षेत्रातील नवोदितांना मोकळेपणाने मार्गदर्शन करायची. त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे याकडेही तिचे लक्ष असायचे. तिच्यामध्ये प्रचंड ऊर्जा होती तसेच उत्तम नेतृत्त्वगुणही होते. तिच्यातील खळाळता उत्साहही लक्षात घेण्यासारखा होता. मुख्य म्हणजे ती कधीही हार मानणार्यांपैकी नव्हती. त्यामुळे कर्करोगासारख्या दुर्धर आजारातून ती नक्की बाहेर येईल असा विश्वास होता. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर सुरूवातीच्या टप्प्यात ती बरी झाली आणि कामही सुरू केले होते. या आजाराला तिने मोठ्या धैर्याने तोंड दिले. परंतु का कोणास ठाऊक, आपण यातून बाहेर पडणार नाही याची तिला अलीकडे जाणीव झाली असावी. कारण आपल्याला कोणी भेटायला येऊ नये असे तिने सांगितले होते. आपली ही अवस्था पाहून इतरांना वाईट वाटेल, दु:ख होईल. तसे होऊ नये हाच स्मिताचा इतरांना भेटायला येऊ न देण्यामागील उद्देश असावा. निर्माती आणि अभिनेत्री या दोन्ही आघाड्यांवर काम करताना त्यांचा एकमेकांवर परिणाम होऊ न देण्याची पुरेपूर काळजी स्मिता घेत असे. निर्मितीच्या क्षेत्रात काम करणे तसे कठीणच. यात समर्थ पुरूषांचीही दमछाक होते. तिथे एक स्त्री असूनही यशस्वी निर्माती असा लौकीक तिने कायम ठेवला. अर्थात, या वाटचालीत तिला अनेक अडचणी आल्या, विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागले. पण त्या सार्यांवर हसतमुखाने मात करत तिने हाती घेतलेले कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले. तिच्या जाण्याने नाट्य तसेच चित्रपटक्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.