इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने पणजी आणि रायबंदर येथील मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदारांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक पाऊल उचलले आहे. या भागातील मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदारांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही, अशी माहिती स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रीगीस यांनी काल दिली.
लोकसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर पणजी आणि रायबंदर भागात स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. स्मार्ट सीटीअंतर्गत कामे सुरू असलेल्या भागात काही मतदान केंद्रे आहेत. त्या मतदान केंद्रांवर मतदारांना सुरळीतपणे जाण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. श्री. रॉड्रीगीस यांनी काही मतदान केंद्रांची पाहणी केली आहे.
मतदारांना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.