स्मार्ट सिटीची सर्व कामे 31 मार्चंपर्यंत पूर्ण होणार

0
0

>> इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्ज यांची माहिती

पणजीतील स्मार्ट सिटीची सर्व कामे येत्या 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे, असे इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे सीईओ संजीत रॉड्रिग्ज यांनी काल स्पष्ट केले. स्मार्ट सिटीची सगळी कामे येत्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करावीत, असा आदेश कंत्राटदारांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
रॉड्रिग्ज यांनी काल शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसह शहरात फिरून वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेल्या कामांची पाहणी केली. पणजी शहरातील रस्ते स्मार्ट सिटीच्या कामासाठी परत परत खोदले जातात, अशी नागरिकांची जी तक्रार आहे व त्याविषयी लोक जो संताप व्यक्त करीत असतात त्याविषयी बोलताना रॉड्रिग्ज म्हणाले की, पणजी शहरात ठिकठिकाणी 15 जुने मॅनहोल आहेत, ते नव्यांशी जोडण्याचे काम हाती घेतलेले आहे. मलनिस्सारण वाहिन्यांची जोडणीही समांतर पातळीनुसारच करावी लागते आणि ते काम किचकट असल्याने त्यासाठी वेळ लागतो. खोदलेले रस्ते बुजवले म्हणजे काम झाले असे नव्हे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.उच्च न्यायालयाने हवा प्रदूषणाच्याबाबतीत काही निर्देश दिले होते. त्यामुळे खोदकाम केलेले रस्ते बुजवावे लागले होते, अशी माहिती देऊन लोकांना वाटते तेवढे हे काम सोपे नसल्याचे रॉड्रिग्ज म्हणाले. स्मार्ट सिटीची कामे आता अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन महिन्यांत ती पूर्ण होतील व 31 मार्चच्या पूर्वी आम्ही हे काम पूर्र्ण करू, असा विश्वास रॉड्रिग्स यांनी व्यक्त केला.