स्मार्ट सिटीची काही कामे अयोग्य पद्धतीने

0
2

कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची कबुली; सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर दिलासा मिळणार

पणजी महानगरपालिका क्षेत्रात जर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे सुरू झाली नसती, तर पणजीची अवस्था आणखी वाईट झाली असती. पणजीतील स्मार्ट सिटीची काही कामे योग्यरित्या झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना विकास कामाच्या वेळी गैरसोयींना तोंड द्यावे लागले. तथापि, स्मार्ट सिटीची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या काही दिवसांत सांतइनेज खाडीची स्वच्छता आणि पाटो-पणजीच्या विकासाची कामे हाती घेतला जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या पणजीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना काल येथे दिली.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पणजी शहराच्या विकासाची गरज होती. शहरातील मलनिस्सारण वाहिनी व इतर साधनसुविधांची दुरवस्था झाली होती. स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी असू शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भाजप हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी भाजपला मनापासून स्वीकारले आहे. काँग्रेसमध्ये आपणाला कोणतेही भविष्य नाही हे त्यांना दिसून आले आहे, म्हणूनच ते भाजपमध्ये सामील झाले. त्यांनी भाजपची विचारधारा स्वीकारली आहे. भाजप सरकारमध्ये एक मंत्री म्हणून महत्त्वाची खाती सांभाळत आहेत. पणजीच्या विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आगामी 2027 च्या विधानसभेच्या निवडणुकीत पणजी पुन्हा कमळ फुलणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्यात आगामी दोन वर्षांत दहा ते बारा हजार जणांना सरकारी नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. सर्वांना सरकारी नोकऱ्या दिल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे युवा वर्गाला खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना गृहकर्ज व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

भाजप पक्ष म्हणजेच एक कुटुंब आहे. या पक्षाच्या हितासाठी सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
यावेळी बाबूश मोन्सेरात, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे व इतरांची भाषणे झाली. यावेळी पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर व इतरांची उपस्थिती होती.