महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजी स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी काल केली. पणजी शहरातील नागरिकांनी आणखी काही दिवस संयम दाखवावा. स्मार्ट सिटीची कामे येत्या 31 मेपर्यंत वेळापत्रकानुसार पूर्ण केली जातील, असे मंत्री मोन्सेरात यांनी यावेळी सांगितले. ज्या मार्गांवर बांधकामे सुरू आहेत, ते रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचे निर्देशही त्यांनी कंत्राटदारांना दिले.
पणजी स्मार्ट सिटीच्या रस्त्याच्या कामांमुळे धूळ प्रदूषणाच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. बांधकामे सुरू असलेल्या रस्त्यांवरून वाहने ये-जा सुरू असल्याने धूळ प्रदूषण होत आहे. धूळ प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम सुरू असलेले रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचे निर्देश देण्यात आला आहे.
पणजी स्मार्ट सिटीतील नवीन बसथांब्यांचे नियोजन अयोग्य आहे. प्रवाशांचा विचार करून बसथांबे बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना याबाबतचे एक पत्र लिहिले असून, बसथांब्यांच्या विषयावर चर्चेसाठी बैठक घेण्याची विनंती केली आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले. या पाहणीच्या वेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स व अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.