स्मार्ट सिटीची कामे घाईगडबडीत; दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

0
8

>> डांबरीकरण केलेला रस्ता पुन्हा खोदला; सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्याला पडल्या भेगा

स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीतील कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी घाईगडबडीत केली जात असल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. येथील गीता बेकरीजवळील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केल्यानंतर भूमिगत चेंबर बुजल्याचे आढळून आले. त्यामुळे काल डांबरीकरण केलेल्या ठिकाणी पुन्हा खोदकाम करण्यात आले. तसेच नव्याने तयार केलेल्या एका काँक्रिटच्या रस्त्याला भेगा पडल्याचे आढळून आल्यानंतर सदर भेगा बुजविण्यात आल्या.

पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत सर्व कामे 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत मलनिस्सारण वाहिनी, रस्ते, गटार व पदपथ विकास आणि इतर कामे सुरू आहेत. जुने रस्ते खोदून त्यांची पुनर्बांधणी केली जात आहे. जुन्या रस्त्यांची दुरुस्ती घाईघाईत केली जात आहे. त्यामुळे नव्याने तयार केलेला रस्ता पावसाळ्यात टिकणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मलनिस्सारण वाहिनीच्या दुरुस्तीसाठी रस्त्यावर खोदकाम केले जात आहे. याशिवाय नव्याने डांबरीकरण करून सुसज्ज केलेले रस्तेही पुन्हा खोदण्यात येत आहेत. या रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी रात्रीच्या वेळी सुध्दा कामे केली जात आहेत. मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत काही विकासकामे निर्धारित मुदतीमध्ये पूर्ण होणे कठीण आहे. जून महिन्यात मोसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर विकासकामे पूर्ण करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

सांतईनेज भागातील विवांता जंक्शन ते काकुलो मॉल आणि मधुबन जंक्शनपर्यंतचा रस्ता मंगळवार 28 रोजी रात्री 9 वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.