- शरत्चंद्र देशप्रभू
अशा अंधारजगतात सांस्कृतिक जाणिवेचा ताळमेळ भौतिक प्रगतीशी घालणे अनिवार्य आहे. जेणेकरून निसर्ग अन् मानवातील संबंध पुनश्च प्रस्थापित होऊन शकतील. त्याग अन् समर्पित वृत्ती याने आत्मकेंद्रित विचारसरणीला आपण लगाम घालू शकतो.
आज गोव्यात पारंपरिक उत्सव-सण यांना ओहोटी लागल्याचे संकेत मिळतात. किंबहुना काही सण सांकेतिक स्वरूपात साजरे केले जातात, तर काही बदलता काळ अन् संदर्भांमुळे लुप्त होत चालल्याचे दिसतात. मुक्तीनंतर आलेल्या क्रांतिकारक बदलामुळे जीवन गतिमान झाले. प्राधान्यक्रमावर वेगळ्याचे विषयांचे ‘आगमन’ झाले. स्पर्धा वाढली तसे ताणतणावही वाढले. उसंतीच्या वेळेवर मर्यादा आल्या. याचे थेट परिणाम छोट्या-मोठ्या सणांवर जाणवू लागले. नारळीपौर्णिमा, गोकुळाष्टमी, नागपंचमी, तुलसीविवाह, शिगमोत्सव अशा सणांना लाभलेल्या सांस्कृतिक अधिष्ठानाचा पाया कमकुवत होऊ लागला. गणेश चतुर्थी व दिवाळी सोडली तर इतर सणांना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. नवे सण, नवे मेळावे यातून नवीन सामाजिक अभिरूची वाढते आहे. राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक नवतेचे एक ओंगळ फ्युजन अवतरत आहे, ज्यांना अभिप्रेत आहे तो निव्वळ चंगळवाद अन् बेदरकारपणा.
या पार्श्वभूमीवर मला खुणावतो तो पन्नास-साठ वर्षांपूर्वी अत्यंत तरल पद्धतीने साजरा होणारा पेडणे येथील आमच्या मधल्या चौपटीतला तुलसीविवाह. याला पेडण्याव्यतिरिक्त अन्य गोव्यातील भागांत ‘व्हडली दिवाळी’ असे पण संबोधले जाते. परंतु पेडण्यात मात्र हे ‘तुळशीचं लगीन’ दिवाळीनंतर आलेल्या द्वादशीला साजरे केले जाते. परंतु याची पूर्वतयारी दीपावलीचे पाच दिवस संपता संपताच होत असे. तुलसीवृंदावन असलेले अंगण साफ करणे, शेणाने सारवून घराची डागडुजी अन् झाडलोट करणे अशी तयारी चालते.
तुलसीवृंदावन रंगवण्याची जबाबदारी परंपरेने चालून आलेली. कै. भालचंद्र नाईक हे व्यवसायाने रंगारी नव्हते; परंतु घराण्याच्या निष्ठेपोटी तुलसी रंगवण्याच्या कामात त्यांनी हयात असेपर्यंत खंड केला नाही. पांढरंशुभ्र धोतर अन् निळीने धुतलेला कडक इस्त्रीचा शर्ट म्हणजे यांचा पेहराव. यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व पण शानदार दिसे. वयपरत्वे पाय दुमडून तुलसीवृंदावन रंगविण्यात त्यांना कष्ट पडत. लहानपणी पण आम्हाला हे जाणवे. परंतु श्री. नाईक हे अबोल वृत्तीचे. चिडचिड नाही. आमचे एकच शल्य म्हणजे आम्हां मुलांत ते मिसळले नव्हते किंवा आस्थेने आमची विचारपूसही करत नव्हते. यामुळे आम्हाला त्यांची वागणूक शिष्टच वाटे. परंतु त्यांना समजण्यास आम्ही कमी पडत होतो हेच खरे. कार्तिकी एकादशीला तुळसीला हळद चढवण्याचा कार्यक्रम भक्तिभावाने केला जात असे. कुठलाही सण असो, त्याकाळी स्त्रियांचा सहभाग शंभर टक्के असायचा. विरंगुळ्याची तेव्हढीच संधी धोपटमार्गी आयुष्याला. सण साजरे करणे म्हणजे गुलाबपाण्याचा शिडकावा. एकादशी म्हणजे उपवास, परंतु आम्हा मुलांना एकादशी म्हणजे चंगळ. चण्याच्या डाळीची हिरव्या मिरच्या घालून केलेली उसळ, गरमागरम चपात्या, मक्याची उकडलेली कणसे, करांडे, काकडीची कोशिंबीर अन् मुगाचे ‘कण्ण.’ आमची एकादशी म्हणजे कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी आपल्या ‘सुदाम्याचे पोहे’त वर्णन केलेली दुप्पट खाशी एकादशी! स्त्रिया मात्र केळ्यावर, खसखसवर भागवत. तुलसीविवाहानिमित्त सारे वातावरण पवित्र, तरल तरंगांनी भारून जात असे. तिन्हीसांजा झाल्यावर तुलसीविवाहाच्या कार्यक्रमास आरंभ होत असे. हळद उतरवल्यानंतर कै. वासुदेवशास्त्री निगळ्ये या पुरोहिताच्या घनगंभीर आवाजात पूजेस आरंभ होत असे. तुलसीवृंदावन आवळे, ऊस, चिंचा यांनी शिगोशिग भरलेला असे. शिवाय रोवलेला ‘दिणा.’ चौकीच्या चारही सोप्यावर पणत्यांची आरास केलेली असे. चार कोनांना लावलेले आकाशकंदील अंधाराचे साम्राज्य भेदून मंद प्रकाशाचे वलय निर्माण करत. दीपावलीच्या पूर्वसंध्येला, किंबहुना गुरू द्वादशीच्या सुमुहूर्तावर टांगलेले हे आकाशकंदील एव्हाना कुटुंबाचे घटकच झालेले असत. वीज जोडणीने पेडण्यात अजून प्रवेश केला नव्हता, यामुळे आकाशकंदील, शिडीवर केलेली पणत्यांची आरास, बरसणारे चांदणे अन् उबदार थंडी… एक वेगळाच माहोल निर्माण होत होता. तुलसीविवाहाला खास ‘हरिजागर’चा प्रयास केला जात असे. तास-दीड तासाच्या पूजेनंतर विधिवत विवाहसोहळा ताशा-ढोलक्याच्या वादनात, मंगलाष्टकांच्या सामूहिक आवाजात मोठ्या जोषात होत असे. त्यावेळी आमच्या घरात वीस ते पंचवीस माणसांची हजेरी असे. विवाह समारंभ आटोपल्यावर चिरमुल्या सुक्या खोबर्यासोबत खात असताना गप्पागोष्टींना उधाण येत असे. खासगीत नकला, गायन, नृत्याचा पण कार्यक्रम होत असे. कनिष्ठ बंधू मोहन नकला करण्यात तरबेज. परंतु नकला खेळीमेळीने स्वीकारायची कुणाची तयारी नसे. नकलेचे लक्ष्य असलेली व्यक्ती हिरमुसणार तर इतर आनंद लुटणार. छोटी बहीण प्रतिभा पण नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करत असे. तुलसीविवाहाला जोडून घरासमोरच्या हनुमान मंदिरात पाच दिवस ‘जागर’ पण केला जात असे. जागर म्हणजे ‘हुप्प हुप्प’ करून एकमेकांवर वानरांसारख्या उड्या मारणे. या वानरगिरीला या पाच दिवसांत मुक्त मुभा असे. या गदारोळात कै. भालचंद्रबुवा ताटकर यांचे कीर्तन होत असे. त्यांनी सांगितलेले कीर्तन त्यांनाच ऐकू येत असे की काय अशी शंका! कार्तिकोत्सव म्हणजे पेडण्यातील शीतल चांदण्यांच्या वर्षावात साजरा होणारा नितांत सुंदर असा, निरामय भक्तिभावाने ओथंबलेला उत्सव. श्रीदेव रवळनाथ मंदिरात होणार्या पाच रात्रीचा पालखीउत्सव. श्रीदेव नारायण मंदिराच्या प्रांगणात होणारा सार्वजनिक तुलसीत्सोव. या सार्या सणांना वेगळाच संदर्भ होता. आश्विन महिन्यात साजरा होणारा दसरोत्स म्हणजे गोव्याचा, कोकणचा आकर्षणबिंदू. दसरोत्सव म्हणजे प्रखर तेजाचा आविष्कार, डामडौलाने साजरा होणारा, ढोल-ताशांचे वादन तर अंगावर शहारे आणणारे. जोषपूर्ण वादन, भाविकांचा उफाळलेला महासागर, सारा परिसर व्यापणारी फेरी, चैतन्याने रसरसलेले वातावरण, हरहर महादेवाचा घातलेला महाघोष अन् देवाचा वरदहस्त कौलाच्या रूपाने मिळवण्यासाठी होत असलेली चढाओढ. याच्या विरुद्ध होणारा कार्तिकी उत्सव वैशिष्ट्यपूर्ण. डामडौल नसलेला परंतु नीरव पिठूर चांदण्यात ओसंडून गेलेला. रवळनाथ मंदिराच्या परिसरात पोफळीच्या तिहेरी पट्ट्यावर पणत्यांची आरास केली जात असे. पालखीचा दुसरा फेरा झाल्यावर पणत्यांतील तेल पळवण्यासाठी झालेली पोराटोरांची लगभग. पालखीवर शिंपडलेल्या चिरमुल्या अन् सुमधुर आवाजात आळवलेले अभंग… शांत, पवित्र वातावरणात सहज विरघळणारे. टाळ-मृदंगाच्या सूरनादात मधोमध चालणारी देवरूप कुडी. मंदिरासमोरचा गोपाळकाला, मंदिर ते नारायणाच्या तळीपर्यंत गुंजणारे ते स्वर ‘रोविला रोविला हरिनामाचा झेंडा रोविला…’ तेवणार्या समया अन् त्रिपुरारी पौर्णिमेच्या चंदेरी चांदण्याने नटलेला, दवबिंदूंनी भिजलेला तो परिसर मनाच्या अणुरेणूत झिरपत जात असे.
आजच्या भौतिक जगतात आपण सारे या दिव्य अनुभवाला पारखे झालो आहोत. जे कुणी अजूनही अशा उत्सवांत रमतात त्यांना उच्चभ्रू समाज मागासलेपणाचा दर्जा देणार. नवनवीन वैज्ञानिक शोधांमुळे जीवनात सुविधा आल्या, सुबत्ता आली. परंतु या बदलामुळे सुख, सुरक्षा, हित यात गुणात्मक बदल घडल्याचे जाणवत नाही. शिवाय अनैतिक स्पर्धेमुळे समाजातील कमकुवत घटक परिघाबाहेर फेकले जातात. या निष्पाप जीवाची कुणालाच तमा नसते. सर्वसमावेशक कल्याणविषयक कळकळ, क्षीण होत चालल्याचे संकेत मिळताहेत. महाविकास, महाशक्ती, विश्वगुरूच्या नादात असहाय्यांना कोणाचाच आधार मिळत नाही. आभासी अन् प्रतिमांच्या विश्वात मूलभूत गरजांकडे, जाणिवांकडे डोळेझाक केली जातेय. पिचलेल्यांच्या जीवनातली वेदना समजण्याची संवेदनक्षमता बदलत्या जीवनात पूर्णपणे बोथट झाल्याचे दिसते आहे. अशा अंधारजगतात सांस्कृतिक जाणिवेचा ताळमेळ भौतिक प्रगतीशी घालणे अनिवार्य आहे. जेणेकरून निसर्ग अन् मानवातील संबंध पुनश्च प्रस्थापित होऊन शकतील. त्याग अन् समर्पित वृत्ती याने आत्मकेंद्रित विचारसरणीला आपण लगाम घालू शकतो. दृष्टिकोन व्यापक करण्याचा तोच एक पर्याय.