सरकारने पर्यटक टॅक्सींना स्पीड गव्हर्नर बसविण्यासाठी ३१ जुलै २०१८ किंवा दोन – तीन उत्पादकांचे स्पीड गव्हर्नर वाजवी दरात उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची नोटीस वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी काल जारी केली आहे.
राज्यातील पर्यटक टॅक्सींना २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत स्पीड गव्हर्नर बसविण्याचे बंधन घालण्यात आलेे होते. त्यामुळे वाहतूक खात्याकडून पर्यटक टॅक्सींना फिटनेस सर्टीफीकेट देताना स्पीड गव्हर्नर बसविण्याची सूचना केली जात होती. राज्यातील पर्यटक टॅक्सी मालकांनी स्पीड गव्हर्नर व इतर प्रश्नांच्या विरोधात तीन दिवस संप केला होता. त्यावेळी स्पीड गव्हर्नर प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन टॅक्सी मालकांना देण्यात आले होते.
राज्यात मुबलक प्रमाणात स्पीड गव्हर्नर वाजवी दरात उपलब्ध नसल्याने सरकारने मुदतवाढ देण्याच्या निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पर्यटक टॅक्सी मालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.