– डॉ. राजीव कामत, खोर्ली – म्हापसा
सध्या गोवाभर विविध देवस्थानांत पूजाआर्चा जोरात चालू आहेत. हे उत्सव साजरे करताना धार्मिक कार्यांबरोबर भजन, कीर्तनादी संगीताचे कार्यक्रमसुद्धा देवाची सेवा म्हणून (की केवळ लोकरंजनास्तव) विविध ठिकाणी साजरे केले जातात. या उत्सवांचा फायदा घेऊन काही संस्था संगीताच्या विविध स्पर्धा आयोजित करतात. यात प्रामुख्याने ‘भजनी स्पर्धा’ फारच लोकप्रिय आहेत व सरकारी पातळीवरूनही त्या घेतल्या जात असल्याने त्यांना फारच महत्त्व येते. त्याचा कळस म्हणजे दरवर्षी कला अकादमीत १५ ऑगस्टला होणारी श्री. मनोहर बुवा शिरगावकर स्मृती भजनी स्पर्धेची अंतिम फेरी. याशिवाय घुमट आरती स्पर्धा, आरती गायन स्पर्धा व इतर संगीत (नाट्यसंगीत, भावगीत, अभंग इत्यादी) स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात. यात अतिशय महत्त्वाची अशी स्पर्धा म्हणजे सम्राट क्लबतर्फे घेतली जाणारी ‘सम्राट संगीत सितारा’ ही शास्त्रीय संगीतावर आधारीत स्पर्धा. आता स्पर्धा म्हटले की त्याचे परीक्षण ही एक अपरिहार्य बाब असते, पण या परीक्षणाच्या बाबतीत जो प्रकार चालतो, त्याला नक्की काय म्हणावे, पक्षपात, राजकारण्यांची चापलुसी की वैयक्तीक हेवेदावे निस्तरायची जागा, हेच कळत नाही.
या स्पर्धांचे परीक्षण काही मोजक्या विद्वान परीक्षकांकडून करून घेतले जाते, पण त्याचबरोबर या स्पर्धांना उपस्थित असणारे शेकडो श्रोते, ज्यात संगीताचे जाणकार पण पुष्कळ असतात, ते आपापल्या परीने स्पर्धेचे परीक्षण करीतच असतात. त्यामुळे जेव्हा निकाल जाहीर होतो, तेव्हा अनपेक्षित निकालामुळे त्याची जाहीर चर्चा होणे स्वाभाविक ठरते.
यावर पहिल्यांदा मोजक्या शब्दांत अशा स्पर्धांचा उहापोह व त्यावर संभाव्य उपाय सुचवावेसे वाटतात –
१) एखाद्या संस्थेतर्फे घेतली जाणारी गीतगायन स्पर्धा ः या स्पर्धेसाठी अर्ज मागवले जातात व एक प्राथमिक फेरी पार पडते. त्यातून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांचा नंतर अंतिम फेरीपूर्वी स्पर्धेच्या वाद्यवृंदांसोबत सराव करून घेण्यात येतो. त्यामुळे या सर्व प्रकाराला स्पर्धा न म्हणता एखादा ऑर्केस्ट्रा का म्हणू नये हा प्रश्न मनात येतो, कारण कुठलीही परीक्षा ही आपण त्या प्रश्नपत्रिकेचा पूर्वसराव न करताच देत असतो. नेहमीप्रमाणे यातसुद्धा परीक्षण हे असतेच, जे बहुतेक वेळा वादग्रस्त ठरते.
२) विविध भजनी स्पर्धाः-
यात आपण फत्त मनोहरबुवा शिरगावकर स्मृती भजनी स्पर्धेचाच विचार करू. गेली कित्येक वर्षे मी या स्पर्धेच्या अंतिम फेरीला अगदी एखाद्या वारकर्याप्रमाणे माझी उपस्थिती लावत आहे. या स्पर्धेचा जर आलेख बघितला, तर या स्पर्धेचा स्तर हळूहळू एकदम उतरंडीला लागलेला जाणवतोय. बहुतेक वेळा या स्पर्धेत होणारे सादरीकरण हे शुद्धतेच्या निकषावर कमी पडते. स्पर्धकांकडून होणारी संतांच्या अभंगांची मोडतोड, आधुनिकतेच्या नावावर होणारी अपारंपरिकता आणि सर्वांत महत्त्वाचें म्हणजे गायकाचें अशुद्ध शब्दोच्चार. उदाहरण द्यायचे झालेच तर ‘(वि)ठोबा रखुमाई’, ‘जनार्धन’, ‘येकनाथ’, ‘भरवा’ (बरवा) इत्यादी. याशिवाय अन्य कित्येक गोष्टींचा अंतर्भाव असतोच.
आता या स्पर्धेतील परीक्षणाबद्दल थोडेसे. गोव्याचे जे पारंपरिक भजन सादर केले जाते, त्याशिवाय परीक्षक म्हणून शास्त्रीय संगीताचे जाणकार न आणता जे वयोवृद्ध भजनी कलाकार आहेत, त्यांना संधी दिली तर ते जास्त संयुक्तिक ठरणार नाही का? एक भजनी गायक कलाकार, एक हार्मोनियम वादक व एक पखवाजवादक हे परीक्षणाचे काम चांगल्या रीतीने करू शकतील, असे मला वाटते. यंदाच्या स्पर्धेत जे परीक्षण झाले, ते बघून नक्की कोणत्या निकषावर ही बक्षिसे दिली गेली, हे समजायला काहीच मार्ग नाही.
३. सम्राट क्लबची ‘संगीत सितारा स्पर्धा’ ः
ही स्पर्धा खरे म्हणजे ‘शास्त्रीय गायन’ या प्रकाराला समर्पित आहे, पण जेव्हा प्राथमिक स्तरावर ही स्पर्धा घेतली जाते, तिथे नाट्यपद किंवा अभंग सादर करण्याची मुभा देण्यात येते, जे वास्तविक व्हायला नको. प्रत्येक केंद्रातून दोन उमेदवार निवडले जातात, जे अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. पण पुष्कळ वेळा असे बघायला मिळते, की एकाच केंद्रात चार – पाच उमेदवार पात्र ठरण्याच्या लायकीचे असतात. त्यामुळे निवड न झालेले हिरमुसले होतात. पुष्कळ वेळा श्रोत्यांत उपस्थित असलेल्या आम्हा संगीतप्रेमींना अमूक अमूक उमेदवार या नंबरवर येणार असे वाटते. पण निकाल जाहीर झाल्यावर प्रचंड उलथापालथ जाणवते. यंदा म्हापसा केंद्रात एक महिला उमेदवार – जिने एक अभंग सादर केला होता. तिला परीक्षकांनी काही तरी शास्त्रीय गायनाची विनंती करून पुन्हा गायला लावले आणि तिला दुसर्या क्रमांकावर निवडले गेले. खरे सांगायचे तर आणखी एक मुलगी छान सादरीकरणामुळे दोन नंबरांत येणार अशी आमची अटकळ होती, पण ती मुलगी विनाकारण बाहेर फेकली गेली. ‘निकाल काहीही लागो, भाग घेणे महत्त्वाचे आहे, हिरमुसले न होता परत पुढच्या वर्षी प्रयत्न करायला हवा.’ असे शाब्दिक बुडबुडे आयोजकांच्या तोंडून ऐकायला चांगले वाटतात, पण प्रत्यक्षात असे वागणे मानवी मनाला धरून आहे काय? याच संदर्भात मला एक आठवते की मागच्या वर्षी याच प्राथमिक स्पर्धेत म्हापशाची एक मुलगी, जिने आपल्या सादरीकरणाने सर्वांना मोहिनी घातली होती, ती फक्त एका बुजूर्ग अशा परीक्षकाच्या मनमानीमुळे बाहेर फेकली गेली होती. या मुलीने यावर्षी स्पर्धेत उतरण्याची तसदीसुद्धा घेतली नाही.
तेव्हा सम्राट क्लबला माझी विनंती आहे की, त्यांनी प्रत्येक केंद्रातील विविध स्पर्धकांच्या सादरीकरणाचे दृक – श्राव्य पद्धतीने चित्रीकरण करून त्यातून अंतिम स्पर्धेसाठी उमेदवार निवडल्यास काही प्रमाणात या उमेदवारांना न्याय मिळेल व स्पर्धेचा स्तरही उंचावला जाईल.