स्नूकर खेळाडू ठरला अट्टल घरफोड्या

0
20

>> पर्वरीत दोघांना अटक; साडेआठ लाखांचे सुवर्णालंकार जप्त

पर्वरी पोलिसांनी दोन अट्टल घरफोड्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून सुमारे 162 ग्राम सुवर्ण अलंकार (साडेआठ लाख रुपये किमतीचा ऐवज) जप्त केला. यातील एक चोरटा सुलेमान शेख हा स्नूकर/पूल खेळाडू असून त्याने नुकत्याच गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. अटक केलेल्या दोघांनाही जुगार खेळण्याचा नाद होता. आर्थिक चणचणीमुळे त्यांनी चोऱ्या करण्याचा मार्ग निवडला होता.
पलीस अधीक्षक निधीन वॉस्सन यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. राज्यात सहा महिन्यांपासून घरफोडीचे प्रकार घडले होते. या घरफोडी चोऱ्यांमध्ये शब्बीरसाहेब शदावली (30, गदग, कर्नाटक) आणि सुलेमान शेख (30, वास्को) या दोघांचा सहभाग होता. पर्वरी पोलिसांनी पर्वरी येथे संशयास्पद फिरताना दोघांना दुचाकीसह अटक केली. या चोरीसाठी त्यांनी दोन दुचाकी चोरून आणल्या होत्या आणि ते दुचाकीवरून कुलूपबंद घरांची टेहळणी करीत असत आणि घरफोडी करीत होते.

पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एक टीम तयार करून म्हापसा, पर्वरी आणि इतर ठिकाणी एकूण 50 सीसी टीव्हीच्या साहाय्याने दोघांचा तपास लावण्याचा प्रयत्न केला असता सीसी टीव्ही फुटेजवरून आणि तांत्रिक सर्व्हेलन्सच्या साहाय्याने चोरांचा शोध घेतला आणि पर्वरी येथे त्यांची धरपकड केली. पोलिसांनी या संशयित दोघांकडून सुमारे साडेआठ लाख किमतीचे 162 ग्रॅम सुवर्णालंकार जप्त केले असून अनेक फायनान्स कंपनीमध्ये तारण म्हणून ठेवलेले सुमारे सहा लाखांचे सोने जप्त केले आहे. पोलिसांनी दोन दुचाकीही चोरांकडून जप्त केल्या आहेत.

या चोरट्यांना पकडण्यासाठी अधीक्षक निधीन वॉल्सन आणि उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल परब, उपनिरीक्षक सीताराम मळीक, सर्वेश भंडारी,महिला उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर, सहा.उपनिरीक्षक उमेश पावसकर, हवालदार नितेश गावडे, महादेव नाईक, उत्कर्ष देसाई, योगेश शिंदे, सिद्धेश नाईक आदी सहकाऱ्यांनी भाग घेतला होता.