स्थानिक टॅक्सीचालकांनीच ऍप सेवेसाठी पुढाकार घ्यावा

0
15

>> वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचे आवाहन; सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्‍वासन

राज्यात ऍपआधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याची नितांत गरज आहे. स्थानिक टॅक्सीचालकांनी ऍप सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकारकडून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत वाहतूक, पंचायत, उद्योग खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.

राज्यात ओला, उबर ही ऍपआधारित टॅक्सी सेवेला मान्यता देण्यापूर्वी या क्षेत्रातील सर्वांशी चर्चा करण्याची गरज आहे, अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी विधानसभेत काल केली. त्यानंतर गुदिन्हो यांनी त्या चर्चेला उत्तर दिले.
आपण राज्यात ओला, उबरच्या धर्तीवर ऍपआधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला नव्हता, तर टॅक्सीचालक ऍपआधारित टॅक्सी सेवेला आमंत्रण देतात, असे वक्तव्य केले होते, असे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

कदंब बसगाड्यांची संख्या कमी आहे. राज्यात प्रदूषण विरहित इलेक्ट्रिक बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. आगामी तीन महिन्यात वाहन चार्जिंग स्टेशनच्या संख्येत वाढ केली जाणार आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले. विधानसभा अधिवेशनात नवीन उद्योग धोरण जाहीर केले जाणार आहे. नवीन उद्योगाबरोबर स्थानिक उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यात आगामी पाच वर्षात २० हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.
पंचायत क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनाकडे जास्त लक्ष दिला जाणार आहे. कचरा व्यवस्थापन निधीत वाढ केली जाणार आहे. पंचायतीच्या कचरा प्रकल्पासाठी कामगार नियुक्त करण्याची गरज आहे. पंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

‘त्यांच्या’मुळे गोव्याचे नाव होतेय खराब : गुदिन्हो
राज्यातील ८० टक्के टॅक्सींना डिजीटल मीटर बसविण्यात आले आहेत. टॅक्सींना कोविडच्या काळात कर माङ्ग करण्यात आलेला आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार टॅक्सींना मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. टॅक्सींना डिजीटल मीटर बसविण्यासाठी अनुदान देण्यात आले आहे. मात्र टॅक्सीचालकांकडून मीटरचा वापर केला जात नाही ही गंभीर बाब आहे. बरेच टॅक्सीचालक प्रामाणिकपणे सेवा देत आहेत, तर काही मोजक्या टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची लुबाडणूक केली जात आहे. त्यांच्यामुळेच गोव्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर खराब होत आहे, असे गुदिन्हो यांनी सांगितले.