>> आता मूर्तीमागे मिळणार 200 रुपये
राज्यात मातीपासून गणेश मूर्ती बनविणाऱ्या स्थानिक कलाकारांना मूर्तीमागे देण्यात येणारे अनुदान दुप्पट करण्यात आले आहे. श्रीगणेश मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांना आता मूर्तीमागे 200 रुपये अनुदान मिळणार असून एका कलाकाराला जास्तीत जास्त 250 मूर्तीसाठी अनुदान दिले जाणार आहे.
मातीपासून श्रीगणेश मूर्ती बनविणाऱ्या स्थानिक कलाकारांना मूर्तीमागे 100 रुपये अनुदान दिले जात होते. गेल्या काही वर्षापासून मातीच्या मूर्तीच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जात होती. राज्यात मातीपासून मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने श्रीगणेश मूर्तीमागे अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारच्या हस्तकला महामंडळाने मातीपासून गणपती मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांना श्रीगणेश मूर्तीसाठी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. राज्यातील चारशेपेक्षा जास्त कलाकारांनी श्रीगणेश मूर्ती अनुदानासाठी अर्ज सादर केले आहेत, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. महामंडळाकडे नोंदणी केलेले कलाकारच अनुदानास पात्र असतील. याचा फायदा नवीन कलाकारांना घेता येणार नाही. नवीन कलाकारांची नावे यादीतून वगळल्यावरच त्यांची नोंदणी केली जाईल, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.