>> जीत आरोलकर यांच्याकडून पुनरुच्चार
नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी पेडणे तालुक्याचा क्षेत्रीय आराखडा स्थगित ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो पेडणे तालुक्यातील जनतेला मान्य नाही. स्थगितीऐवजी हा आराखडाच रद्द करावा, अशी मागणी आमदार जीत आरोलकर यांनी काल विर्नोडा येथे विविध पंचायतींच्या सरपंचांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
आम्ही विकासाच्या विरोधात नाही. आम्हाला पेडणेकरांचे हित जपणारा विकास पाहिजे. पेडणेकरांच्या जमिनी भावी पिढीसाठी शाबूत राखण्यासाठी हा आराखडा रद्द करावा. जोपर्यंत हा आराखडा रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा विरोध सुरुच राहणार असल्याचे जीत आरोलकर म्हणाले.
नागरिकांच्या आणि पंचायतीच्या सूचना सरकारने जाणून घेतल्या पाहिजेत. स्थानिकांना विश्वासात घेऊनच सरकारने आणि मंत्र्यांनी पुढील कृती करावी. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी हा आराखडा रद्द करावा, असेही आरोलकर म्हणाले.
या पत्रकार परिषदेला मांद्रेचे सरपंच अमित सावंत, तुयेच्या सरपंच सुलक्षणा नाईक, आगरवडे-चोपडेचे सरपंच सचिन राऊत उपस्थित होते.