स्त्रीमुक्ती चळवळ आणि तिचे सबलीकरण

0
471
  • डॉ. जयंती नायक

सगळे भेदभाव, शोषण ज्यावेळी संपेल, तिला पुरुषाच्या बरोबरीने समाजात सगळ्या स्तरांवर स्थान मिळेल, आणि ती स्वनिर्णयानं आपले व्यवहार हाताळील, त्यावेळी माझ्या मते गोव्यातील स्त्री पूर्णार्थाने सबल आणि सशक्त बनेल.

आजचा भारतीय समाज हा पुरुषप्रधान समाज आहे. तसे पाहता पुरुषप्रधान समाजाची पाळे-मुळे आज जगभरच पसरलेली आहेत. या समाजाने स्त्रीला दुय्यम व हीन मानलेले आहे आणि हरप्रकारे कौटुंबिक तसेच सामाजिक स्थरावर तिच्या शक्तीचे खच्चीकरण केलेले आहे. स्त्री ही एक व्यक्ती नसून ती एक वस्तू आहे आणि तिचा मालकीहक्क आपला आहे या भावनेने तिचे शोषण केलेले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजे साधारणतः चार-पाच दशकांपासून भारतात स्त्रीउद्धाराचे कार्य जोमाने चालत आहे. ‘स्त्री सबलीकरणातून समाजाचा उध्दार!’ हा मंत्रच जणू आज सरकारी आणि निमसरकारी पातळीवर जपलेला दिसतो. स्त्रीमुक्ती चळवळ आणि स्त्री-सबलीकरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू. किंबहुना स्त्रीमुक्ती चळवळीतून स्त्री-सबलीकरणाची संकल्पना उदयाला आली. कौटुंबिक तसेच सामाजिक क्षेत्रांत स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार असावा, तिला समानतेची आणि आदराची वागणूक मिळावी हे स्त्रीमुक्ती चळवळीचे उद्दिष्ट, तर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्त्रीने आत्मनिर्भर व्हावे, स्वयंसिद्ध व्हावे हे स्त्री-सबलीकरणाचे लक्ष्य. शिक्षण आणि अर्थिक स्वायत्ता हे या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचे साधन.

आधुनिक जगावर प्रभाव टाकणार्‍या विविध विचारप्रवाहांचा जन्म जसा पश्चिमी जगात झाला आणि मग तो जगभरातील इतर देशांत पसरला, त्याच पद्धतीने स्त्री-उद्धाराची अथवा स्त्रीमुक्ती चळवळीची सुरुवात सर्वप्रथम पश्चिमी देशांत झाली आणि मग ती जगातील इतर भागांत पसरली. अठराव्या शतकात पश्चिमी देशांतून औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. या क्रांतीतून व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार पुढे आला. गुलाम, कामगार, अस्पृश्य, काळे निग्रो इत्यादींच्या बरोबरीने स्त्री पण समाजाकडे आपले हक्क मागू लागली. व्यक्ती स्वातंत्र्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या चळवळीतून जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती समान असते आणि तिला या जगात मुक्तपणे जगण्याचा अधिकार असतो, हा मूलभूत विचार मान्य झाला आणि या प्रेरणेतून स्त्रीमुक्ती चळवळ जन्माला आली. या शतकात स्त्रीच्या अस्मितेविषयीची पहिली जागृती झाली ती अमेरिकेत. माणसाचे व्यक्ती-स्वातंत्र्य मान्य केलेल्या इथल्या समाजाला स्त्रीने ‘मी पण एक माणूसच आहे, मला पण मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे’ हे खडसावून सांगायला सुरुवात केली. इंग्लंडमधील स्त्री-चळवळ ही याच काळी सुरू झाली. एकोणिसाव्या शतकात या चळवळीला वेग आला. तर पुढच्या शतकात, पहिल्या महायुद्धानंतर स्त्रियांच्या मागण्या मान्य होऊन ही चळवळ स्थिरावली. फ्रांसमधील स्त्री-मुक्ती चळवळ फ्रेंच राजक्रांतीच्या प्रभावातून सुरू झाली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या राजक्रांतीच्या तीन ध्येयांच्या घोषणांनी येथील स्त्रियांनाही आपल्या हक्काची जाणीव झाली. रशियातही साधारणपणे याच काळी स्त्रीमुक्ती चळवळ उभारली गेली.

दुसर्‍या महायुद्धानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जागतिक स्थरावर एकूणच समाजजीवनात वेगाने बदल घडायला सुरुवात झाली. शोषीत-पीडित बहुजन समाजाला आपल्या अधिकारांविषयी जाग आली. याचाच परिणाम म्हणायला हरकत नाही, संयुक्त राष्ट्रसंघाने (यूएनओ) १९४८ या वर्षी आपल्या जाहीरनाम्यात माणसांच्या मूलभूत हक्कांना मान्यता दिली आणि ती देताना स्त्री-पुरुष समानताही मान्य केली.
जागतिक स्तरावर स्त्रीमुक्तीच्या जागृतीत काही लेखिकांचा आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा वाटा खूप मोठा आहे. यामध्ये १९४९ साली फ्रेंच भाषेत प्रसिद्ध झालेला सिमोन द बोव्ह या लेखिकेने लिहिलेला ‘द सेकेंड सेक्स’, बेटी फ्रिडम यांचा ‘द फेमिनीन मिस्टीक’ (१९६०), मेरी हिलमन यांचा ‘थिंकिंग ऑफ द वूमन’ (१९६०) आणि कॅट मेरट यांचा ‘सेक्सुयल पॉलिटिक्स’ (१९६९) हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत.

भारतात स्त्रीमुक्ती चळवळीची सुरुवात एकोणिसाव्या शतकात इंग्रजांच्या राजवटीत सुरू झाली. इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चात्त्य विचारांची ओळख होऊन नवशिक्षितांना हिन्दू समाजातील प्रथा, रुढी, परंपरा स्त्रीचा छळ करणार्‍या, तिचे शोषण करणार्‍या आहेत असे जाणवले आणि त्या नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी चळवळी उभारल्या. सती, बालविवाह, विधवांवरचे अत्याचार, स्त्रीभृणहत्या, परित्यक्ता स्त्री आणि प्रौढ कुमारिकांना समाजात मिळणारी हीन वागणूक इत्यादींविरुद्ध या उदारमतवाद्यांनी चळवळी उभारल्या. या उदारमतवाद्यांची वा समाजसुधारकांची एक मोठी फळीच या काळी तयार झाली, ज्यामध्ये राजाराम मोहन रॉय, ईश्वरचंद विद्यासागर, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले ही त्यांतील काही नावे इथे आवर्जून नोंद करायला हवीत.

स्त्रामुक्ती चळवळीची सुरुवातीची सूत्रे पुरुषाच्याच हाती होती, परंतु पुढे स्त्रियांनी ती आपल्या हाती घेतली. समाजाच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन काही ध्येयवादी स्त्रियांनी स्त्रीमुक्ती चळवळीचे कार्य केले. या स्त्रियांच्या यादीत अग्रस्थानी नाव येते ते पंडिता रमाबाई, दुसरे लक्ष्मीबाई टिळक यांचे. अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, मंजू गांधी, अरुणा असफअली, मृणाल गोर्‍हे, प्रेमा पुरव, डॉ. निलम गोर्‍हे यांचेही कार्य उल्लेखनीय आहे.
देश-विदेशांतील स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रभावातून गोवामुक्तीनंतर गोव्यात स्त्रीमुक्ती चळवळीने बाळसे धरले. काही व्यक्तींनी तसेच संघटनांनी गोमतकीय स्त्रीच्या हक्काची आणि अधिकाराची चळवळ लढवली आणि लढवीत आहेत. त्यांची नावे घ्यायचीच झाली तर अखिल भारतीय वुमन्स कॉन्फरन्स (१९६२), बायलांचो साद (१९८६), बायलांचो एकवट (१९९२), बायलांचो मंच (१९९३), वुमन्स एंटरप्रेनर्स ग्रुप (१९९०), नारी अन्याय निर्मूलन समिती (१९९२) या काही संघटना, तर व्यक्तींमध्ये- श्रीमती आवडा व्हियेगस, श्रीमती साबिना मार्टिन्स, श्रीमती हेमा नायक इत्यादी. श्रीमती हेमा नायक यांनी चित्रंगी हा साहित्यिक स्वरूप असलेला मंच तयार करून त्याव्दारे स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली अन् त्यांना सबल होण्यास प्रेरित केले. तसे पाहता वरील संघटना आणि व्यक्तींनी गोमंतकीय स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य करण्याच्या बराच काळ अगोदर पोर्तुगिजांनी तिच्या उद्धाराचे आणि सबलीकरणाचे कार्य सुरू केले होते. सती, बालविवाह, विधवा स्त्रियांचे केशवपन, बहुपत्नीत्व, शेसविधीसारख्या स्त्रियांचे शोषण करण्याच्या प्रथांवर त्यांनी बंदी आणली. तसेच वडिलोपार्जीत संपत्तीत मुलीला मुलाबरोबर समान हक्क, विवाहाची कायदेशीर नोंदणी, घटस्फोट घेण्याचा हक्क इत्यादी नियम करून स्त्रीचे जीवन सुधारण्यास त्यांनी मदत केली. एवढेच नव्हे तर सामाजिक जागी स्त्रियांनी पोलकं न घालता वावरण्यावर त्यांनी घातलेल्या बंदीमुळे त्यांच्या आत्मसन्मानाचे रक्षणही झाले. वरील कायदे-नियम करण्याचा पोर्तुगिजांचा हेतू येथील स्त्रियांचे जीवन सुधारण्याचा बिल्कुल नव्हता, तरी त्यामधून स्त्री-उद्धाराचे कार्य घडले आहे.

१९ डिसेंबर १९६१ ला गोव्यातील पोर्तुगिजांची सत्ता अस्ताला गेली तरी त्यांनी केलेल्या कायद्या-नियमांमुळे येथील स्त्री काही प्रमाणात सबल झाली, आत्मनिर्भर झाली. भारतातील इतर राज्यांतील स्त्रीच्या तुलनेत गोमंतकीय स्त्री जास्त सबल असून आपल्या अधिकारांविषयी जागृत असण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
पोर्तुगीज काळाच्या शेवटच्या टप्प्यात गोमंतकात स्त्री-शिक्षणाचा पाया घातला गेला. पोर्तुगीज तसेच मराठी भाषेत मिळालेल्या या शिक्षणाने तिला आत्मविश्‍वास प्राप्त करून दिला मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वर्गांतील स्त्रीपर्यंत जरी या काळी शिक्षण मर्यादित राहिले हे खऱे असले तरी त्यामुळे गोमंतकीय स्त्रियांचा काही टक्का या शिक्षणामुळे स्वयंसिद्ध आणि सबल झाला हे सत्य नाकारता येत नाही. कारण या शिक्षणामुळे कित्येक स्त्रिया शिक्षिकेच्या, परिचारिकेच्या वगैरे नोकरी करून आपल्या संसाराला हातभार लावत होत्या तसेच आपले जीवन सन्मानाने जगत होत्या.
गोवा मुक्तीला साठ वर्षे झाली. या साठ वर्षांत गोव्यातील स्त्रियांची अथवा महिलांची स्थिती काय आहे, याचा ऊहापोह करताना एक गोष्ट आवर्जून मान्य करावी लागेल, ती म्हणजे, निश्चितच या साठ वर्षांत गोव्यातील स्त्रीचा विकास घडलेला आहे. शासकीय आणि बिगर शासकीय संस्थांकडून तिच्या सबलीकरणासाठी प्रयत्न झाले आहेत आणि होत आहेत. आजच्या घडीला पंचविशीपर्यंतच्या वयोगटातील एखादी स्त्री अपवादानेच शिक्षणापासून वंचित असेल. किमान प्राथमिक चार वर्गापर्यंत तरी शिक्षण तिच्या पदरात आहे. आज गोव्यातील स्त्री सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे. कोणतेच क्षेत्र तिला वर्जित नाही. तांत्रिक, वैद्यकीय धरून सुरक्षा क्षेत्रातही तिचे पाऊल पडले आहे. आपल्या शिक्षणाच्या पुंजीवर नोकरी-व्यवसाय करून ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहे. फक्त गृहिणी म्हणून वावरणे निदान आजच्या पिढीतील स्त्रीला मान्य नाही, त्यामुळे ती शासनाच्या किंवा इतर संस्था अथवा सेल्फ हेल्प ग्रुपच्या मदतीने अर्थार्जन करीत आहे. ग्रामीण भागातील स्त्रिया पूर्वीपासूनच शेती-धंद्यात होत्या. मुख्य भातशेतीशिवाय त्या भाजीपाला, फळ-फळावळीच्या, फुलांच्या उत्पन्नात वावरायच्या. आता तर स्त्रिया जाणीवपूर्वक हा धंदा स्वतंत्रपणे किंवा नवरा-मुलगा इत्यादींच्या मदतीने तो करताना दिसतात. शेतीच्या धंद्याशिवाय येथील स्त्री इतर कामे करूनही कमावते आहे, हेसुद्धा नोंद करावे लागेल. पूर्वी मध्यमवर्गीय स्त्रीला घराबाहेर पडता येत नसे. तिच्यावर खूपच बंधने होती. आता ती बंधने झुगारून ती शिक्षण आणि अर्थार्जनासाठी बाहेर पडताना दिसते, अन् तिचे हे बाहेर पडणे घर आणि समाजाने मान्य केलेले आहे. कौटुंबातसुद्धा आता मुलगा-मुलगी हा भेद बर्‍याच प्रमाणात नाहीसा झालेला आहे. उलट आज मुलगी कमावून गरजू आई-वडिलांचा सांसारिक बोजा लग्नानंतरही कमी करताना दिसते. स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुलगी आज जागृत बनलेली आहे. एके काळी मुली-महिलांना वाहन चालवायला येत नसल्याने त्या घरातील पुरुष मंडळीवर येण्या-जाण्यासाठी निर्भर होत्या. आज सर्रासपणे त्या वाहने चालवताना दिसतात. व्यावसायिक वाहनेही स्त्रियांनी चालवण्यास सुरुवात केली आहे. स्त्री सबलीकरणातील हा एक मोठा टप्पा मानावा लागेल.

गोवा सरकारने आरोग्य, समाज कल्याण, शिक्षण, संस्कृती अशा विविध खात्यांव्दारे स्त्री सक्षमतेच्या आणि सबलीकरणाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. बर्‍याच अंशी स्त्रिया या योजनांचा फायदा घेताना दिसतात. राजकारणातही स्त्रीने पुढे यावे यासाठी राखीवता ठेवली आहे, ज्यामुळे स्त्रिया पंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा जागांवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊन स्वतःचा व्यक्तीविकास घडवताना दिसतात. प्राथमिक स्तरावर का असेना, राजकारणात वावरल्यामुळे ही स्त्री खूपच निर्भर झालेली दिसते. विधानसभेत आणि लोकसभेत मात्र स्त्रियांचे प्रतिनिधित्व शुल्लक आहे हेसुद्धा येथे नमूद करावे लागेल.

साहित्य क्षेत्रातही गोव्यातील महिला पुढे आली आहे. एकेकाळी स्त्रियांना लेखन करण्यास बंदी होती; पण आज तिचे लेखन हा घरात, समाजात कौतुकाचा आणि सन्मानाचा विषय बनलेला आहे. साहित्याचे सर्व प्रकार स्त्री आज हाताळत आहे. कालपर्यंत तिचे प्रश्‍न-समस्या पुरुष मांडत होता; आज ती स्वतः मांडत असल्याने ती त्यांना न्याय देत आहे आणि हे स्त्रीवादी साहित्य तिच्या अस्तित्वाचा लढा लढण्याचे एक महत्त्वाचे अस्त्र पण बनलेले आहे.
सांस्कृतिक क्षेत्रात गोव्यातील स्त्री पहिल्यापासूनच आघाडीवर होती. ‘धालो’सारखा महत्त्वपूर्ण लोकोत्सव तर तिच्याच वर्चस्वाखाली खेडोपाडी संपन्न होत होता. आता स्त्रियांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी शासकीय आणि नीमशासकीय स्तरावर व्यासपीठे प्राप्त झालेली आहेत. ग्रामीण भागातील एकेकाळची लाजरी-बुजरी स्त्री आता बिनधास्त होऊन या व्यासपीठावर वावरत आहे. हे व्यासपीठ तिच्या अंगातील कलागुणांच्या विकासाबरोबरच तिच्या आर्थिक स्वायत्तेचेही साधन बनलेले आहे.

ग्रामीण ते शहरी, खालचा वर्ग ते उच्च वर्ग या सगळ्या स्तरांवर आपल्या हक्काची जाणीव असलेली गोमंतकीय स्त्री आता पूर्णपणे सबल बनलेली आहे असे छातीठोकपणे म्हणता येत नाही. आजही कितीतरी स्त्रियांचे मानसिक तसेच शारीरिक शोषण होत आहे. अधिकारांची जाणीव असूनही नात्याच्या गोतावळ्यात स्त्रिया आपला बळी देत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत कमी असले तरी आजही तिच्यावर बलात्कार होत आहेत. सरकारी खात्यांनी स्त्रियांच्या सुरक्षतेसाठी समित्या नेमलेल्या असल्या तरी नोकरीच्या जागी तिचे शोषण होत आहे. आजही धार्मिक आणि इतर ठिकाणी स्त्री-पुरुष भेदभाव केले जातात. कामाचा मोबदला किंवा मजुरी देताना स्त्रियांना तो कमी दिला जातो अथवा वेगळे निकष लावले जातात. राजकारणात उतरलेल्या स्त्रियांचं सूत्र पुरुष आपल्या हाती ठेवतात.
हे सगळे भेदभाव, शोषण ज्यावेळी संपेल, तिला पुरुषाच्या बरोबरीने समाजात सगळ्या स्तरांवर स्थान मिळेल, आणि ती स्वनिर्णयानं आपले व्यवहार हाताळील, त्यावेळी माझ्या मते गोव्यातील स्त्री पूर्णार्थाने सबल आणि सशक्त बनेल.