– डॉ. सोमनाथ कोमरपंत
व्यथेचे फूल झाले. निसर्गानुभूतीतून नवीन प्रतिमाविश्व जन्मास आले. उत्कटता आणि चिंतनशीलता यांमुळे ‘शेला’पासून ‘निराकार’पर्यंतचा त्यांचा काव्यप्रवास समृद्ध होत गेला. त्यांची पृथगात्म शब्दकळा जेवढी लावण्यमय तेवढीच अंतर्मुख करणारी.
इंदिरा संत यांची भावकविता ही आधुनिक मराठी कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण धारा आहे. त्यांची प्रारंभीची कविता ही सहवासोत्तर प्रेमाची अभिव्यक्ती होती. मराठीतील सुप्रसिद्ध लघुनिबंधकार ना. मा. संत यांच्याबरोबर १९३५ मध्ये त्यांचा विवाह झाला. १९४६ मध्ये ना. मा. संतांचे अकाली निधन झाले. अकरा वर्षांचे समृद्ध सहजीवन संपुष्टात आले. दोन मुले आणि एक मुलगी यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी इंदिरा संतांवर येऊन पडली. पतिवियोगाचे तीव्र दुःख, त्यामुळे जीवनात आलेले एकाकीपण आणि वाट्याला आलेले प्रखर वास्तव यांच्याशी तोंड देत बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रारंभी अध्यापिका आणि नंतरच्या काळात प्राचार्या म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. सर्वप्रकारची दाहकता पचवीत असताना कवितेचे बीजांकुर त्यांनी होरपळू दिले नाहीत. या उलट निगुतीने त्यांनी काव्यसाधना केली. व्यथेचे फूल झाले. निसर्गानुभूतीतून नवीन प्रतिमाविश्व जन्मास आले. उत्कटता आणि चिंतनशीलता यांमुळे ‘शेला’पासून ‘निराकार’पर्यंतचा त्यांचा काव्यप्रवास समृद्ध होत गेला. त्यांची पृथगात्म शब्दकळा जेवढी लावण्यमय तेवढीच अंतर्मुख करणारी.
‘मध्यमवर्गी गार्गी’ ही त्यांची नेहमीच्या पठडीतील कविता नव्हे. ती आहे स्त्रीच्या वाट्याला आलेल्या भोगवट्यासंबंधीची. त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय स्त्रीच्या जीवनातील सुख-दुःखांचे कंगोरे तीव्रतेने रेखाटणारी. काव्यात्म. चिंतनशील. पूर्वापार काळापासून ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ हाच परवलीचा शब्दप्रयोग स्त्रीजीवनाला लागू पडणारा. कविवर्य शंकर रामाणी यांनी कवितेतून काढलेले वेगळ्या संदर्भातील-
तीन उन्हाचे दगड ठेविले
त्यावरी रांधिले जिणे
हे उद्गार स्त्रीजीवनातील दुःखाला चपखलपणे लागू पडतात. भारतीय जीवनसंदर्भात विचार करताना प्राचीन काळातील गार्गी आणि मैत्रेयी या विदुषी व बुद्धिमान स्त्रिया सहजतेने आठवतात. त्या मनस्विनीदेखील होत्या. हे सारे भावसंदर्भ मनात बाळगून इंदिरा संतांची ‘मध्यमवर्गी गार्गी’ अवतरलेली आहे. वास्तवानुभूतीतून आलेली ही गार्गी आपल्याला सभोवतालच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाच्या संदर्भात विचार करायला लावणारी आहे.
या मध्यमवर्गी गार्गीने तीन दगड रचून जी चूल मांडलेली आहे ती कशी आहे? इंदिरा संतांनी समुचित आणि समर्पक शब्दांत तिची जीवनरेखा चित्रित केली आहे ः
एक दगड कष्टाचा
एक दगड काळाचा
एक दगड त्यागाचा
वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा.
अशी सुरेख चूल घरोघरी असलेली
घर सांभाळणारी… घर जोपासणारी
तिचेंच नाव गृहस्वामिनी. गृहलक्ष्मी
घरधनीण. अशी गृहाघराने वेढलेली. जखडलेली
घरभर घुमणारी भोवर्यासारखी
दंग आणि अतृप्त
कवयित्रीने रंगविलेल्या या शब्दचित्रात विशिष्ट एका स्त्रीचे चित्र रेखाटलेले नाही. मध्यमवर्गीय स्त्रीच्या वाट्याला येणार्या दुःख-व्यथांचे त्यात चित्रण आहे. तिच्या जीवनातील भ्रमनिरासाचे, अपुर्या आकांक्षांचे चित्रण आहे. घर आणि घरातील माणसे हाच तिच्या चिंतनाचा केंद्रबिंदू आहे. ‘घरभर घुमणारी भोवर्यासारखी’ या प्रतिमेतून प्रपंचापायी आपल्या शरीररहाटाला तिने दिलेली गती, मधूनच भोवर्यासारखी होणारी तिच्या जीवनाची फरफट सूचित होते. ती संसारचक्रात मग्नही आहे, पण तिचे मनोरथ पूर्ण न झाल्यामुळे ती अतृप्तही आहे. त्यात स्त्रीच्या सुख-दुःखाचा लघुत्तम साधारण विभाजक आढळतो. त्यामुळे हे दुःख प्रातिनिधिक स्वरूपाचे झालेले आहे. अधूनमधून तिच्या कानावर सर्वांना मानवणार्या, चविष्ट शब्दांचे मथळे पडतात ः
आधुनिक स्वतंत्र स्त्री. स्त्रीचा विकास.
स्त्रीची प्रगतिपथावरील वाटचाल. इत्यादी इत्यादी
कानामनाला वाक्ये गोड लागणारी
आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत पोचणारी.
पण हीच स्त्री दमून-भागून घरी येते. तिला चुलीची धग लागते तेव्हा तिच्या सार्या रमणीय स्वप्नांचा पार चुराडा होतो. तिला जाणीव होते ती अशी ः
त्या मथळ्यांची मालकीण
पर्सच्या हुद्याबरोबरच सांभाळून आणलेल्या त्या
वाक्यांची लाकडे चुलीला लावते
अधिक लवकर चहा व्हावा म्हणून
चहाच्या तरतरीतच पंख आवरून घ्यायला हवेत.
तरलतेने उंच आकाशात डोलणार्या सार्या उदात्त कल्पनांचा डोलारा खळकन् पृथ्वीतलावर उतरतो… चक्काचूर झालेली स्वप्ने सर्वत्र मातीत विखुरली जातात आणि वास्तव वाट्याला येते ते सार्या जीवनाची ससेहोलपट करणारे ः
आणि मग कुकर. मग पोळ्या. मग फोडण्या.
थोरापोरांच्या मनधरण्या. नोकरांच्या काचण्या.
किती तरी धागे. घट्ट जखडून ठेवणारे.
सगळाच शिणवटा. शिजवणारीही तिच.
आणि शिजणारीही तीच.
अधोरेखित आशय मूळ काव्यानुभूतीला अधिक सखोलता, अधिक गहिरेपणा आणून देणारा. शोकात्म कळा प्राप्त करून देणारा. मध्यमवर्गी गार्गी या शीर्षकातच अंतर्विरोध सामावला आहे. त्यातील उपहासव्यंजकता आजच्या स्त्रीजीवनाच्या वास्तवावर भेदक प्रकाश टाकणारी आहे.