>> आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा; राज्यातील 1 लाख महिलांची तपासणी पूर्ण
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळा (गोमेकॉ) मध्ये स्तनांच्या कर्करोगावर प्रभावी इंजेक्शन ‘फेसगो’ येत्या 4 फेब्रुवारीपासून विनामूल्य देण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दोनापावल येथे एका कार्यक्रमात काल केली.
राज्यात स्तन कर्करोग तपासणी मोहिमेत 1 लाख महिलांची तपासणी पूर्ण झाली. यानिमित्त दोनापावल येथील राजभवनातील नवीन दरबार सभागृहात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात आगामी दीड वर्षात अडीच लाख महिलांची तपासणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या डीडीएसएसवाय योजनेखाली कर्करोगग्रस्तांनाही आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. राज्यातील कर्करोगग्रस्तांना डीडीएसएसवाय योजनेंतर्गत मोफत उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी याविषयावर चर्चा करणार आहे. डीडीएसएसवाय योजनेत कशा पद्धतीने बदल करता येईल, याबाबत विचार सुरू आहे. या विषयावर एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीचा अहवाल आल्यावर तो मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
राज्यात आगामी दोन महिन्यांत कर्करोगग्रस्तांचीही डिजिटल नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. कर्करोग रुग्णाची रजिस्ट्री तयार केली जाणार आहे. याशिवाय राज्यातील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना कर्करोगग्रस्तांची माहिती आरोग्य खात्याला देणे बंधनकारक केले जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.