>> किंग्ज पंजाबला ७ गड्यांनी नमविले
>> गेलची ९९ धावांची विस्फोटक खेळी वाया
बेन स्टोक्सच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून मिळालेले १८६ धावांचे लक्ष्य लिलया पेलत आयपीएलच्या १३व्या पर्वातील प्लेऑफच्या आपल्या आशा जिवंत राखल्या आहेत. पराभवामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला आता १ नोव्हेबरला होणार्या लढतीत सीएसकेला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागणार आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबकडून मिळालेले १८६ धावांचे लक्ष्य राजस्थान रॉयल्सने ७ गडी व १५ चेंडू बाकी राखत गाठले. रॉबिन उथप्पा व बेन स्टोक यांनी चांगली सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. स्टोक्स ६ चौकार व ३ षट्कारांसह २६ चेंडूंत ५० धावांची अर्धशतकी खेळी करून बाद झाला. त्यानंतर उथप्पा व संजू सॅमसन यांनी दुसर्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. उथप्पा ३० धावा करून बाद झाला. एक चोरटी धाव घेेण्याच्या नादात धाचित झालेल्या संजूचे अर्धशतक दोन धावांनी हुकले. शेवटी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (नाबाद ३१) व जोस बटलर (नाबाद २२) यांनी संघाचा विजय साकारला. विजयामुळे राजस्थान रॉयल्स पाचव्या स्थानावर पोहोचले असून उर्वरित दोन्ही सामने जिंकत त्यांना प्लेऑफमध्ये धडक देण्याची अजूनही चांगली संधी आहे. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने ख्रिस गेलच्या विस्फोकट अर्धशतकाच्या बळावर ४ गडी गमावत १८५ अशी धावसंख्या उभारली. पंजाबची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर मनदीप सिंग खाते खोलण्यापूर्वीच जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर ख्रिस गेलने फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेताना कर्णधार लोकेश राहुलच्या साथीत दुसर्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. राहुल (४६) स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. निकोलस पूरनने २२ धावा जोडल्या. ६३ चेंडूंत ६ चौकार व ८ षट्कारांची आतषबाजी करीत ९९ धावांवर बाद झालेल्या गेलचे शतक केवळ एका धावेने हुकले. आर्चरने त्याला त्रिफळाचित केले. राजस्थानकडून आर्चर व स्टोक्स यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
धावफलक
लोकेश राहुल झे. राहुल तेवातिया गो. बेन स्टोक्स ४६, मनदीप सिंग झे. स्टोक्स गो. जोफ्रा आर्चर ०, ख्रिस गेल त्रिफळाचित ९९, निकोलस पूरन झे. राहुल तेवातिया गो. बेन स्टोक्स २२, ग्लेन मॅक्सवेल नाबाद ६, दीपक हूडा नाबाद १.
अवांतर ः ११. एकूण २० षट्कांत ४ बाद १८५ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-१ (मनदीप सिंग, ०.६), २-१२१ (लोकेश राहुल, १४.४), ३-१६२ (निकोलस पूरन, १७.६), ४-१८४ (ख्रिस गेल, १९.४).
राजस्थान रॉयल्स ः रॉबिन उथप्पा झे. निकोलस पूरन गो. मुरुगन अश्विन ३०, बेन स्टोक्स झे. दीपक हूडा गो. ख्रिस जॉर्डन ५०, संजू सॅमसन धावचित (सब. सुचित) ४८. स्टीव्ह स्मिथ नाबाद ३१, जोस बटलर नाबाद २२.
अवांतर ः ५. एकूण १७.३ षट्कांत ३ बाद १८६ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-६० (बेन स्टोक्स, ५.३), २-१११ (रॉबिन उथप्पा, १०.५), ३-१४५ (संजू सॅमसन, १४.२).
गोलंदाजी ः अर्शदीप सिंग ३/०/३४/०, मोहम्मद शमी ३/०/३६/०, मुरुगन अश्विन ४/०/४३/१, ख्रिस जॉर्डन ३.३/०/४४/१, रवी बिश्नोई ४/०/२७/०
गेलने गाठला हजारी पल्ला
केवळ एका धावेने शतक हुकलेल्या विस्फोटक खेळीत गेलने आणखी एक भीमपराक्रम केला. ९९ धावांवर बाद झालेला गेल टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार षटकार खेचणारा पहिला फलंदाज ठरला आहे. कायरॉन पोलार्ड (६९०), ब्रँडन मॅक्कुलम (४८५), शेन वॉटसन (४६७), आंद्रे रसेल (४४७) व एबी डीव्हिलिर्य (४१७) हे अन्य फलंदाज त्याच्यापासून बरेच दूर आहेत. गेलने हा हजारी पल्ला गाठताना २९ वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त षटकार खेचले आहेत.