स्टोक्सचा मास्टरस्ट्रोक

0
117

>> इंग्लंडने केला ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग

>> यजमानांची मालिकेत बरोबरी

बेन स्टोक्सच्या धाडसी शतकाच्या जोरावर यजमान इंग्लंडने तिसर्‍या ऍशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. स्टोक्सने शेवटच्या गड्यासाठी जॅक लिच (१) याच्यासह ७६ धावांची अविभक्त भागीदारी रचली. यात स्टोक्सचा वाटा ७४ धावांचा होता. इंग्लंडने ३५९ धावांचे विक्रमी लक्ष्य १२५.४ षटकांत गाठले. स्टोक्सने २१९ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार व ८ षटकारांनी आपली खेळी सजवली.
तत्पूर्वी, तिसर्‍या दिवसाच्या ३ बाद १५६ धावांवरून काल पुढे खेळताना इंग्लंडने ज्यो रुट (७७) याला लवकर गमावले. लायनच्या झपकन आत आलेल्या चेंडूवर वॉर्नरने त्याचा सुरेख झेल घेतला.

जॉनी बॅअरस्टोव (४६) व स्टोक्स यांनी यानंतर पाचव्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटली तेव्हा इंग्लंडला विजयासाठी केवळ १०४ धावांची गरज होती. परंतु, इंग्लंडची ४ बाद २४५ वरून ९ बाद २८६ अशी घसरगुंडी उडाली. बटलर (१), वोक्स (१) या अष्टपैलूंनी निराश केले तर जोफ्रा आर्चर १५ धावा काढून बाद झाला.

स्टोक्सने यानंतर जॅक लिच किमान चेंडू खेळेल याची दक्षता घेताना सर्वाधिक स्ट्राईक स्वतःकडे राखत धोके पत्करले. स्टोक्सला वैयक्तिक १३१ धावांवर लायनने जीवदान दिले. तत्पूर्वी ११६ धदावर असताना मार्कुस हॅरिसने त्याचा झेल सोडला होता. दबावाखाली ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू वाया घालविल्याने मोक्याच्या क्षणी त्यांना याचा वापर करता आला नाही.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १७९ धावांना उत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव ६७ धावांत संपला होता. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसर्‍या डावात २४६ धावा केल्या होत्या. मालिकेतील चौथा सामना ४ सप्टेंबरपासून खेळविला जाणार असून तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ डर्बीशायरविरुद्ध २९ ऑगस्टपासून तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे.