अमेरिकेच्या स्लोन स्टीफन्स हिने लाटवियाच्या येलेना ओस्टापेंको हिला ७-६ (७-५), ६-१ असे पराजित करत प्रथमच मायामी ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले. विद्यमान युएस ओपन विजेत्या स्टीफन्सने सहा विजयी फटके लगावताना २१ टाळता येण्यासारख्या चुका केल्या. परंतु, यानंतरही तिने विजयाला गवसणी घातली. चुकांच्या बाबतीतल ओस्टापेंकोने स्टीफन्सवर कुरघोडी करताना २० गेम्समध्ये तब्बल ४८ टाळता येण्यासारख्या चुका करत स्टीफन्सच्या विजयात हातभार लगावला. ओस्टापेंकोला आपल्या पहिल्या सर्व्हिसवर केवळ ३९ टक्के गुण घेता आले. कमकुवत सर्व्हिसचा फटका तिला पराभवाच्या रुपात बसला. एक तास ३१ मिनिटे चाललेल्या या सामन्याचा पहिला सेट टायब्रेकरपर्यंत लांबला. दुसर्या सेटमध्ये मात्र स्टीफन्सने प्रतिस्पर्ध्याला डोके वर काढू दिले नाही.