>> तिघांचा समावेश, सर्व संशयित मूळ उत्तर प्रदेशमधील
>> १५ लाखांचा ऐवज पोलिसांकडून जप्त
पणजी व आसपासच्या परिसरात लोकांच्या चारचाकी गाड्या फोडून त्यातील महागडे कार स्टिरिओ लंपास करणार्या एका आंतरराज्य टोळीला काल पणजी पोलिसांनी अटक केली.
ह्या टोळीतील तिघेजण हे महाराष्ट्रात राहत असून ते मूळ उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांची नावे जुबेर, जगन्नाथ व प्रदीप अशी आहेत. ह्या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीचा माल तसेच चोरीसाठी वापरलेली चारचाकी गाडीही ताब्यात घेतली आहे. ह्या चोरट्यांच्या टोळक्याने गेल्या काही दिवसांपासून राजधानी पणजीबरोबरच म्हापसा, पर्वरी, पोलीस स्थानक हद्दीत व आजूबाजूच्या परिसरात उच्छाद मांडला होता.
ह्या टोळक्याने पणजी, म्हापसा व पर्वरी परिसरात रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या १८ आलिशान चारचाकी गाड्या फोडून आतील महागडे कार स्टिरिओ लंपास केले होते. चोरीला गेलेल्या एकूण कार स्टिरिओंची किंमत ८ लाख रुपये एवढी होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला.
१९ ते २१ ऑगस्टच्या दरम्यान ह्या टोळक्याने ह्या कारगाड्या फोडून ही चोरी केली होती. पर्रा येथे पेट्रोल पंपसमोर पार्क केलेली माविन ब्रिटो यांची (जीए ०३ झेड ४५०४) ही स्कॉर्पिओ गाडी फोडून ६० हजार रुपयांचा स्टिरिओ, हरिश्चंद्र शिरसाट यांची (जीए-०३ व्हाय ०९५३) ही हुंडाई ग्रँड आयटेन फोडून महागडा स्टिरिओ लंपास केला होता. तसेच पणजी येथे चार गाड्या फोडण्याचा प्रकार घडला होता. दादा वैद्य रस्त्याच्या बाजूला ठेवलेली निवृत्त न्यायमूर्ती रामचंद्र बी. एस. खांडेपारकर यांची (जीए.-०७ एन. १०२९) ही व्हॅगनार फोडून आतील १ लाख रुपयांचा स्टिरिओ चोरट्यांनी पळवला होता. तसेच गाडीची तोडफोडही केली होती. त्याशिवाय राजधानी पणजीत ह्या टोळक्याने आणखी तीन गाड्या फोडून कार स्टिरिओ लांबवले होते.
टोळीतील तिघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. दि. १७ रोजी प्रकरणाचा पणजी, पर्वरी व म्हापसा पोलिसांनी छडा लावत अंदाजे १५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.