आय्आय्टीसारखी एखादी संस्था जर गोव्यात सौर उर्जेसंबंधीचा एखादा प्रकल्प उभारण्यासाठीचा प्रस्ताव घेऊन आली तर गोवा सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. अशा प्रकारचे छोटे प्रकल्प उभारण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आय्आय्टीबीएएच्या पदवीधरांच्या बिझनेस फोरमने आयोजित केलेल्या ‘एक्सप्लोरिंग ऍनर्जी फ्रन्टियर्स’ या विषयावरील परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. उर्जेसाठीच्या नव्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी संशोधनावर भर देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. उर्जेची बचत करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. जलविद्युत प्रकल्प हा सुध्दा एक चांगला पर्याय असल्याचे ते यावेळी म्हणाले. पुढील २० ते ३० वर्षांचा काळ लक्षात घेऊन उर्जा नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रा. अली कॉन्ट्रॅक्टर, हरीश हांडे, ज्योयमन थॉमस, आरडेशिर कॉन्ट्रॅक्टर, विकास दाबर, प्रा. चेतनसिंग सोळंकी यांनी परिषदेत आपली मते मांडली. यावेळी जॉयमन थॉमस म्हणाले की पुढील ५० वर्षे पुरतील एवढे तेलसांठे अस्तित्वात आहेत. मात्र, जेव्हा २०३५ साल उजाडेल तेव्हा भारतासारख्या देशाला तेल खरेदीवरच प्रचंड पैसा खर्च करावा लागेल.