आजपासून सुरू होणार्या दहाव्या टाटा ओपन भारतीय आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेसाठी माजी राष्ट्रीय विजेत्या सौरभ वर्मा याला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. २०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत सहभागी होणारा तो पुरुष एकेरीतील सर्वोत्तम स्थानावरील (४८वे स्थान) खेळाडू आहे. अभिषेक येलेगरला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत मलेशिया, थायलंड या देशातील खेळाडूसुद्धा सहभागी झाले आहेत.
पुरुष एकेरीत युवा खेळाडू गियाप ची गोब व लीम ची विंग (मलेशिया) यांच्यासह भारताचे प्रतुल जोशी व लक्ष्य सेन हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतील. महिला एकेरीत रितुपर्ण दास व श्रीकृष्णप्रिया यांना पहिली दोन मानांकने बहाल करण्यात आली आहेत. यिओ जिया मिन व चुआ हुई झेन ग्रेस (सिंगापूर), यिन फून लिम (मलेशिया) व साई उत्तेजिता राव (भारत) या काही आघाडीच्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना तर महिला दुहेरीत मेघना व पूर्विशा यांना पहिले मानांकन मिळाले आहे.