सौरभ चौधरी प्रथम स्थानी

0
122

तुघलकाबाद येथील डॉ. कर्णी सिंग रेंजवर झालेल्या ऑलिंपिक नेमबाजी निवड चाचणीमध्ये सौरभ चौधरी याने पुरुषांच्या एअर पिस्तोल प्रकारात ५८८ गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्षीय सौरभ याने २०१८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. यानंतर दोन वैयक्तिक सुवर्णपदके तसेच मनू भाकरसह चार मिश्र सांघिक सुवर्णपदके देखील भारताला मिळवून दिली होती. या चाचणीपूर्वी सौरभची यापूर्वीच्या चाचणींतील कामगिरी ५८५, ५८१, ५८७, ५८०, ५८६, ५८४ व ५८३ अशी शानदार होती. भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने आशियाई क्रीडा स्पर्धा, विश्‍व अजिंक्यपद, विश्‍व चषक व आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे टोकयो ऑलिंपिकसाठी खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु, दिल्लीतील विश्‍वचषक स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आल्याने ही चाचणी घेण्यात आली. मागील वर्षी विश्‍वचषकात दोन सुवर्णपदकाला गवसणी घातलेला अभिषेक वर्मा ५८५ गुणांसह दुसर्‍या स्थानी राहिला. प्रत्येक विभागात काही मोजकेच नेमबाज असल्यामुळे स्पर्धेची अंतिम फेरी न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांच्या एअर पिस्तोलमध्ये ऑलिंपिकपटू अनू राज सिंग ५७९ गुण घेत पहिल्या स्थानावर राहिली. ईशा सिंगपेक्षा तिने एक गुण अधिक घेतला. ऑलिंपिक कोटा मिळविलेल्या मनू भाकर व यशस्विनी देसवाल यांनी अनुक्रमे ५७४ व ५७० गुणांचा वेध घेतला. ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये आघाडीची चारही स्थाने ऑलिंपिक कोटा मिळविलेल्या खेळाडूंनीच मिळविली. यात ऐश्‍वर्यप्रताप सिंग तोमर, अंजुम मौदगिल, तेजस्विनी सावंत व संजीव राजपूत यांचा समावेश होता.

सविस्तर निकाल
१० मीटर एअर पिस्तोल ः पुरुष १. सौरभ चौधरी (५८८), २. अभिषेक वर्मा (५८५), ३. धर्मेंद्र सिंग (५७९), ४. ओम प्रकाश मिथरवाल (५७७), ५.गौरव राणा (५७६)
५० मीटर रायफल थ्री पोझिशन ः ऐश्‍वर्यप्रताप सिंग तोमर (११७८), २. संजीव राजपूत (११६९), ३. चैन सिंग (११६९), ४. स्वप्निल कुसले (११६९),
१० मीटर एअर पिस्तोल ः महिला ः १. अनू राज सिंग (५७९), २. ईशा सिंग (५७८), ३. मनू भाकर (५७४), ४. यशस्विनी देसवाल (५७०)
५० मीटर रायफल थ्री पोझिशन ः १. अंजुम मौदगिल (११७४), २. तेजस्विनी सावंत (११७०), ३. आयुषी पोद्दार (११६८), ४. सुनिधी चौहान (११६३), ५. गायत्री नित्यानंदन (११५८)