रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतासाठी बुधवारचा दिवस चांगला ठरला. सौरभ वर्मा व रितुपर्णा दास यांच्यासह एकूण सहा भारतीयांनी ७५,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी काल गाठली.
आठव्या मानांकित सौरभने भारताच्याच राहुल यादव चित्ताबोईना याचा २३-२१, २१-११ असा पराभव केला. माजी राष्ट्रीय विजेत्या रितुपर्णाने स्थानिक खेळाडू व्हिक्टोरिया स्लोबोडियानूक हिला महिला एकेरीच्या लढतीत २१-११, २१-१८ असे पाणी पाजले. सिर्द्धा प्रताप सिंग, पाचवा मानांकित शुभंकर डे, सातवी मानांकित मुग्धा आग्रे व वृशाली गुम्माडी यांनी आगेकूच केली.
पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज व सन्यम शुक्ला यांनी तिसरी फेरी गाठली. अनुभवी अजय जयराम, पारुपल्ली कश्यप व गुरुसाईदत्त यांना दुसर्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. शुभंकरने जयरामला तीन गेममध्ये १५-२१, २१-१४, २१-१५ असे हरविले तर चौथ्या मानांकित कश्यपला जपानच्या रोयोतारो मारुओ याच्याकडून २१-१२, २१-११ असा पराभव पत्करावा लागला. रशियाच्या द्वितीय मानांकित व्लादिमीर मालकोव याने एकतर्फी लढतीत गुरुसाईदत्तला २१-१४, २१-८ असे हरविले. सिद्धार्थने भारचाच्या बोधित जोशीला २१-८, २१-१४ असे हरवून शुभंकर डे याच्याशी गाठ पक्की केली. महिला एकेरीत मुग्धाने मलेशियाच्या यिन फुन लिम हिला २१-१६, २१-१९ असे तर वृशालीने रशियाच्या एलेना कोमेनद्रोवास्का हिला २१-११, २१-१६ असा दणका दिला. अरुण व सन्यम जोडीने स्थानिक जोडी व्लादिमीर निकुलाव व आर्टेम सेरपियोनोव यांना २१-१५, २१-१५ असे नमविले. अन्य भारतीयांमध्ये प्रतुल जोशी याला अटीतटीच्या लढतीत तिसर्या मानांकित मिश्चा झिल्बरमन याच्याकडून १२-२१, २१-१८, १३-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.