सोमवारपासून कळंगुट येथे अ. भा. राजभाषा संमेलन

0
83

कोलकाता येथील राष्ट्रीय हिंदी अकादमीतर्फे २७ ते २९ ऑक्टोबर या दरम्यान गोव्यात अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन सत्रात गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, प. बंगालचे राज्यपाल डॉ. केशरीनाथ त्रिपाठी, उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. अजित कुरैशी व कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय हिंदी अकादमीचे अध्यक्ष स्वदेश भारती यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. हडफडे येथील मेरीना जेराडा या हॉटेलात हे संमेलन होणार आहे. त्यात विशेष हिंदी प्रशिक्षण कार्यशाळा, कवी संमेलन, राजभाषा प्रदर्शन आदींचा समावेश असेल. हिंदी भाषा तसेच अन्य भारतीय भाषांतील साहित्याला उत्तेजन देणे यासाठी राष्ट्रीय हिंदी अकादमी कार्य करीत असून वरील संमेलन हा या कार्याचाच एक भाग असल्याचे ते म्हणाले. मराठी, कोकणी, उडिया, नेपाळी, बंगाली, तमिळ, तेलगु, मल्याळम्, कन्नड आदी भाषांतील पुस्तकांचा हिंदीत अनुवाद करण्याचे काम चालू असल्याचे ते म्हणाले.